नाशिक : मनपासमोर अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन | पुढारी

नाशिक : मनपासमोर अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिका कामगार-कर्मचारी संघटनेने (सीआयटीयू संलग्न) अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंगळवारी (दि. १) आंदोलन केले. मनपाच्या मुख्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या. यावेळी मनपा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेने दिलेल्या निवेदनात अग्निशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेत असून, या विभागातील ८९ फायरमन आणि २७ वाहनचालक ही संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना १२-१२ तास ड्यूटी करावी लागत आहे. तसेच एका केंद्रावर १ फोन ऑपरेटरसह तीन ते चार कर्मचारी उपस्थित असतात. मात्र, अशाही परिस्थितीत हे कर्मचारी त्यांचे काम चोखपणे बजावत आहेत. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांमध्ये या विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील पहिल्या थकीत हप्त्याची रक्कम योग्य परिगणना करून विनाविलंब अदा करावी. अग्निशमन कर्मचाऱ्यांना दुसरा व चाैथा शनिवार, शिल्लक शासकीय सुट्यांचा मोबदला व जादात तास कामाचा अतिकालिक भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित दराने देण्यात यावा. तसेच या विभागातील अधिकार-कर्मचाऱ्यांना कालबद्ध पद्धतीने पदोन्नतीचे लाभ दिले जावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. तानाजी जायभावे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.

हेही वाचा:

Back to top button