नाशिक : मेनरोडवरील मनपा इमारतीला लाभणार पुनर्वैभव | पुढारी

नाशिक : मेनरोडवरील मनपा इमारतीला लाभणार पुनर्वैभव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेच्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन दगडी इमारतीच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने सव्वादोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. स्थायी समितीच्या येत्या सभेवर हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतीला पुनर्वैभव लाभणार आहे.

नाशिक नगरपालिका असताना १९३७ मध्ये मेनरोड येथे दगडी इमारत उभारण्यात आली. सध्या या इमारतीमध्ये नाशिक मनपाचे पूर्व कार्यालय कार्यरत होते. मात्र, या इमारतीच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात झालेल्या पडझडीमुळे इमारतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पुरातत्त्व विभाग व वास्तुविशारद यांच्या सूचनेनुसार, इमारतीला तूर्त वाळूच्या गाेण्यांचा आधार देण्यात आला आहे. तसेच पूर्व विभागाचे कार्यालय हे जुन्या पंडित काॅलनीमधील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित केले आहे. दरम्यान, मेनरोडवरील इमारतीच्या दुरुस्तीचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो स्थायीच्या बैठकीवर ठेवण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने केलेल्या प्रस्तावात दगडी इमारतीला ज्याठिकाणी तडे जाऊन दगड निखळले आहेत, तेथे दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी तुटलेले सज्जे दुरुस्त करणे, पॉइंटिंग, प्लास्टर, टाइल्स दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामे केली जातील. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार यासाठी अजिंक्यतारा कन्सल्टंट नाशिक यांच्याकडून सविस्तर प्राकलन तयार करण्यात आले आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

भालेकर हायस्कूलच्या दुरुस्तीसाठी १ कोटी

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बी. डी. भालेकर हायस्कूलच्या इमारतीत पूर्व विभागीय कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, भालेकर हायस्कूलच्या इमारतीत काही आवश्यक दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे एक कोटीचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चासाठी महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात कुठलीही आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्यामुळे भालेकर हायस्कूलच्या इमारतीत पूर्व विभागीय कार्यालय स्थलांतरित होऊ शकले नाही.

हेही वाचा:

Back to top button