नाशिक : मनपाची ढोल बजाव मोहीम जोरात, सिडकोत ‘इतकी’ वसुली | पुढारी

नाशिक : मनपाची ढोल बजाव मोहीम जोरात, सिडकोत 'इतकी' वसुली

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने मंगळवारी (दि.1) घरपट्टी थकबाकीदारांच्या घरासमोर तसेच कारखान्यासमोर राबविण्यात आलेल्या ढोल बाजाव मोहिमेत एकाच दिवसात चार थकबाकीदारांकडून सुमारे साडेसात लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या घरपट्टी मिळकतधारकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकबाकी आहे. दरम्यान सदरची थकबाकी ही वसूल करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुन्हा आता एक लाखाहून अधिक थकबाकी आहे अशा थकबाकीदारांच्या घरी तसेच कारखान्यासमोर मंगळवार (दि.1) पासून ढोल बजाव मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालय अंतर्गत घरपट्टीच्या एकूण एक लाख वीस हजारांहून अधिक मिळकतधारक आहेत. यामध्ये घर, शॉप, सरकारी ऑफिस, टॉवर आदींचा समावेश आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांनी सिडको विभागीय कार्यालयास मार्चअखेर सुमारे 85 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे.यापैकी 30 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 24 कोटी इतकी थकबाकी वसूल झाली आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार थकबाकीदारांच्या घरी अथवा कारखान्यांसमोर थकबाकी वसुलीसाठी धडक ढोल बजाव मोहीम राबविण्यात येत असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. दि.1 ते 3 नोव्हेंबर यादरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये मंगळवारी राणेनगर व चेतनानगर या भागांत विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अंबादास विधाते, यशवंत लहामगे व कर्मचार्‍यांनी ही मोहीम राबवित चार थकबाकीदारांकडून सात लाख 67 हजार 800 इतकी थकबाकी वसूल केल्याचे मनापा सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button