नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू

नाशिक , पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील मेरी वसाहतीत राहत्या घरात एकाचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संजय वसंतराव वायकांडे (38, रा. मेरी कॉलनी) असे मृताचे नाव आहे.

संजय वायकांडे हे जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी (दि.1) त्यांची माहेरी गेलेली पत्नी सकाळी मुलांसमवेत परतली असता, ते बेशुद्धावस्थेत आढळले. यावेळी पत्नी व मुलांनी तोंडावर पाणी मारून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. शेजार्‍यांच्या मदतीने त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. शवविच्छेदनात गळ्याला इजा झाल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, पंचवटी गुन्हे शोध पथक यांनी धाव घेतली. तसेच घटनास्थळी देखील पाहणी केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात पत्नीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

Back to top button