पुणे : तीन महिने प्रदीप शर्मा ससूनमध्येच | पुढारी

पुणे : तीन महिने प्रदीप शर्मा ससूनमध्येच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहात प्रकृती बिघडल्याने चकमकफेम अधिकारी अशी ओळख असलेले पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचा मुक्काम अद्यापही ससून रूग्णालयातच आहे. त्यामुळे असे नेमके कोणते उपचार शर्मा यांच्यावर सुरू आहेत? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणी शर्मा यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.

सुरक्षिततेच्या कारणास्तव शर्मा यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. कारागृहात पोटात दुखू लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर पुन्हा कारागृहात नेल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.

त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करून विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे ससून रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत आहेत. त्यांना इतके दिवस रूग्णालयात का ठेवण्यात आले, याबाबत कारागृह प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासन यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Back to top button