‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची टाटा समूहाची तयारी | पुढारी

‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची टाटा समूहाची तयारी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. तसे पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे.

गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत त्यांचे लक्ष वेधले होते. टाटा सन्सच्या विस्तारासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा ‘मिहान’मध्ये उपलब्ध आहेत. महामार्ग, रेल्वे तसेच विमानसेवा अशी दळणवळणाची भक्कम सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समूहातर्फे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्री, व्होल्टास लिमिटेड, असे विविध प्रकल्प ‘मिहान’मध्ये उभारले जाऊ शकतात, असे गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून या समूहाच्या निदर्शनास आणून दिले होते.

या पार्श्वभूमीवर नटराजन यांनी गडकरी यांना पत्र पाठवले आहे. ‘मिहान’मध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) ने एक आराखडा तयार केला आहे. लवकरच आमची टीम नागपूर येथे येऊन मिहान येधील उद्योग विस्ताराच्या संदर्भात सर्वेक्षण करेल, असे पत्रात सांगितले आहे. टाटा समूहाचा मिहानमधील प्रस्तावित एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत असताना नागपूरसाठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे.

नटराजन यांनी गडकरी यांचे आभार मानले आहे. आम्ही येथील रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चांगल्या प्रकारे जोडलेल्या भागात एसईझेड आणि बिगर एसईझेड जमिनीची उपलब्धताही लक्षात घेतली आहे, असे नटराजन यांनी पत्रात नमूद करत मिहानमध्ये येण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

Back to top button