नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात | पुढारी

नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीसह बागायती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी उसनवारी करीत दुबार पेरणी करीत पिकांची लागवड केली होती. असे असताना सध्या यावर्षी पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहिले. गेल्या दोन-तीन दिवसांत धुवाधार झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावे, परिसरातील भातपिकांसह, बागायती शेती धोक्यात आली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या बागायतींचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवडाभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे बेलगाव तर्‍हाळे येथील शेतकरी निवृत्ती वारुंगसे, कुंडलिक सोनवणे, अनिल सोनवणे, पांडुरंग वारूंगसे, राहुल वारुंगसे, सोपान वारुंगसे, नामदेव आव्हाड यांच्या भात, सोयाबीन, काकडी आदी पिकांसह अन्य बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी बेलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष वारुंघुसे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंघुसे आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे. सध्या पूर्व भागात जोरदार अतिवृष्टी होत असल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली भात शेती व इतर बागायती पिके ही पावसामुळे आडवी होऊन भुईसपाट होत आहेत. यात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आम्हा शेतकर्‍यांची आहे. – संतोष वारुंगसे, उपसरपंच, बेलगाव तर्‍हाळे.

हेही वाचा:

Back to top button