सातारा : बळीराजाची दिवाळी शिवारातच | पुढारी

सातारा : बळीराजाची दिवाळी शिवारातच

कण्हेर; बाळू मोरे :  दिवाळीनिमित्त सर्वत्र जल्लोष सुरू असताना बहुतांश शेतकरी वर्ग नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पावसाच्या तडाख्यातून उरले-सुरले सोयाबीन, भुईमूग, मूग, चवळी, उडीद आदी कडधान्य काढण्याची कामे सुरू असल्याने शेतकरी शिवारातच दिसत आहेत. सणांचा झगमगाट घरात ठेवून शेतकरी वर्षभराची पोटाची खळगी भरण्यासाठीच्या तयारीला लागला असून आपल्या कुटुंबासह शेतात राबत आहे.

सणानिमित्त पै-पाहुण्यांची वर्दळ सुरू असताना शेतकरी मात्र शिदोरी बांधून घेऊन सकाळी सकाळीच शेताची वाट तुडवत आहे. यंदा पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. ऐन दिवाळीत शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले असून त्यांचा घास हिरावला गेला आहे. जीवापाड जपलेलं पीक डोळ्यादेखत पावसाने मातीमोल केली. या तडाख्यातून काहीसा तग धरलेल्या पिकांना कवटाळून शेतकरी जगण्याची नवी उभारी घेवू पहात आहे. पावसाच्या तडाख्यातून उरले-सुरले सोयाबीन, भुईमूग, मूग, चवळी, उडीद आदी कडधान्य काढण्याची कामे सुरू असल्याने शेतकरी शिवारातच दिसत आहेत.

कमी कालावधीत येणार्‍या सोयाबीन, भुईमुगासह कडधान्याच्या काढणीत शेतकरी गुंतला आहे. पिकांची कापणी, मळणी करून त्याला वारे देण्यापासून ते वाळवून धान्य घरात आणण्याच्या कामात शेतकरी गुंग असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वर्षभराची तजवीज करण्यासाठी शेतकरी कुटुंब राबताना दिसत आहे. पिकांची काढणी पूर्ण झाली आहे, अशा काही मोजक्या ठिकाणी रब्बी हंगामासाठी शिवार तयार केले जात आहे.

Back to top button