नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात | पुढारी

नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देवळा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांना कर बुडविणे महागात पडणार आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्यासाठी नोटीस बजावूनदेखील 11 सदस्यांनी 90 दिवसांच्या आत कर भरलेला नाही. सदस्यांनी मुदतीत करभरणा न केल्यामुळे त्यांच्यावर सदस्य अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी ग्रामस्थ समाधान महाजन यांनी मालेगाव अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

लोहोणेर ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य असून, त्यापैकी तब्बल 11 सदस्यांनी ग्रामपंचायतीचा करभरणा विहित मुदतीत केला नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. मुख्य बाब म्हणजे ग्रामस्थांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती फेरी काढली, त्यांनीच कर चुकवेगिरी केली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या 14(ह) अन्वये कर भरणा नोटीस पाठविल्यानंतर 90 दिवसांच्या आत कर भरणे आवश्यक आहे. परंतु सदस्यांनी कर भरला नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

आमची लढाई कायदेशीर असून, ज्या सदस्यांनी विहित मुदतीत करभरणा केला नाही, त्यांची तक्रार आम्ही प्राधिकरणाकडे करून न्याय मिळवणार आहोत.

– समाधान महाजन, तक्रारदार

हेही वाचा :

Back to top button