

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दसर्यात ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे कोट्यवधींची उलाढाल झाल्यानंतर व्यापारीवर्गाचे लक्ष आता दिवाळीच्या उलाढालीकडे लागून राहिले आहे. दसर्यातील उलाढालीमुळे दिवाळीत बंपर खरेदीचा अंदाज व्यापारीवर्गाकडून वर्तवला जात आहे.
कोरोना काळातील दोन वर्षांच्या कालखंडानंतर निर्बंधमुक्त खरेदीचा आनंद ग्राहकांनी लुटला. चांगली उलाढाल झाल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. दसर्यात ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहन उद्योगाकडून विविध ऑफर्स दिल्या गेल्या. अनेक कंपन्यांनी दिवाळीपर्यंत खरेदीसाठी कुपन पद्धत जाहीर केली आहे. ग्राहकांना 'ऑन द स्पॉट' वित्त पुरवठा करणार्या कंपन्यांचे प्रतिनिधीही सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. बाजारपेठेतील आर्थिक चक्र गतिमान झाले आहे.
दिवाळीत कापड उद्योगात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. रेडीमेड कपड्यांना मोठी मागणी आहे. आतापासूनच व्यापार्यांनी दिवाळीसाठी सेल जाहीर केले आहेत. याशिवाय फटाक्यांची आतषबाजीही मोठ्या प्रमाणात होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहन उद्योगाला मोठी मागणी असणार आहे. दसरा सणाचे औचित्य साधून जी खरेदी झाली तशीच खरेदी दिवाळी सणात होणार आहे. अनेक ग्राहकांनी वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बुकिंग केले आहे. दुचाकी चारचाकी, ई-बाईक, इलेक्ट्रिक व्हेईकलला यंदा चांगली मागणी होती. वाहन उद्योगात शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दिवाळीत यात दुप्पट-तिप्पट वाढ होण्याचा अंदाज आहे.
स्मार्टफोन, लॅपटॉप, मोबाईल अॅक्सेसरीज यासह होम अप्लायन्सेस, वॉशिंग मशिनची खरेदी करण्यात आली. या क्षेत्रात सुमारे 50 ते 80 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी शून्य टक्के व्याज दर, ई-कॉमर्सवरील दरांमध्ये वस्तूंच्या विक्रीसह अन्य विविध योजना उपलब्ध करून दिल्या असल्याने इलेक्ट्रॉनिक्स मार्केट दिवाळीत चांगलेच फुल्ल असणार आहे.
सोने खरेदीकडेही कल
दिवळीनंतर येणार्या लग्नसराईसाठी सोने खरेदीची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. दिवाळी सणात खरेदीचा आनंद लुटला जाणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कमी वजनाचे नक्षीदार व आकर्षक कलाकुसर असणार्या दागिन्यांचे तसेच डायमंडला मागणी आहे. सोने दरातील चढ-उतारामुळे यात सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही पाहिले जात आहे, असे महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांनी सांगितले.
रेडीमेड गारमेंटला मागणी
तयार कपड्यांना यंदा चांगली मागणी आहे. शर्टस्, ट्राऊझर्स, लहान मुलांचे कपडे, मुलींसाठी चुडीदार, फॅन्सी कपडे, साड्यांचे नवनवीन डिझाईन, यामुळे ग्राहकांची आतापासूनच गर्दी होत आहे, असे गारमेंट असोसिएशनचे विक्रम निसार यांनी सांगितले.
बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण
व्यापारीवर्गासाठी दसरा सण जसा चांगला गेला, तसाच दिवाळी सणही जाणार आहे. कारण, दोन वर्षांनंतर प्रथमच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. यंदा दसर्यामध्ये अंदाजे आठशे ते एक हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दिवाळीत यात नक्कीच वाढ होणार आहे, असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.