नाशिक : रेल्वे मालगाडीची बोगी घसरल्याने वाहतूक विस्कळीत | पुढारी

नाशिक : रेल्वे मालगाडीची बोगी घसरल्याने वाहतूक विस्कळीत

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
मुंबईहून नाशिककडे येणार्‍या मालगाडीची शेवटची बोगी मंगळवारी (दि.20) रात्री 11 च्या सुमारास कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याजवळ रुळावरून घसरली. त्यामुळे मुंबईहून येणार्‍या-जाणार्‍या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा प्रवासात अडथळा निर्माण झाला होता.

या मार्गाच्या रेल्वेगाड्या काही तास उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कामगार व मशनरी लावून पहाटे चारपर्यंत रेल्वे बोगी बाजूला करण्याचे काम सुरू केल्याने बुधवारी (दि.21) दुपारपर्यंत रेल्वे मार्ग मोकळा केला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. याठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घाटमाथा आणि धुके व पावसाच्या हलक्या सरी असल्याने कर्मचार्‍यांना काम करण्यास अडचणीचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीतही मध्य रेल्वेचे अनेक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. युद्धपातळीवर काम सुरू असून, वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली. रात्री दाट धुक्यात रेल्वे रूळ व सिग्नल दिसत नसल्याने धीम्या गतीने रेल्वे मालगाडी येत असताना गाडीची मागील गार्ड बोगी अचानक रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेत गार्डला कोणतीही दुखापत झाली नाही.

रेल्वेगाड्या काही तासांकरिता थांबवल्या
रात्री मुंबईहून येणार्‍या सर्व गाड्या कल्याणसह पुढील स्थानकादरम्यान काही तासांसाठी थांबविण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी एक रेल्वे या लाइनने सोडण्यात आल्यानंतर दुपारपर्यंत सर्व मार्ग सुरळीत करण्यात आला असून, प्रवाशांनी रेल्वे कर्मचारी व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा:

Back to top button