

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: पुरातन कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाच्या सोमवतीच्या ओट्याचा जीर्णोद्धाराचा शुभारंभ घटस्थापनेला सोमवारी (दि. 26) करण्याचा निर्णय धामणी ग्रामस्थ व भाविकांनी घेतला आहे. ही माहिती प्रकाश जाधव पाटील, ग्रामस्थ, देवाचे पुजारी भगत, वाघे व वीर मंडळींनी दिली.
येथील खंडोबा देवस्थान पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे कुलदैवत आहे. खंडोबाच्या सोमवती अमावस्येला पंचक्रोशीतील मानकरी भाविक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर धामणीला येतात. सोमवतीला येथील वाघे व वीर मंडळी खंडोबाचा पंचधातूचा विलोभनीय मुखवटा मंदिरातील पुजारी भगत मंडळीकडून घेऊन पालखीतून वाजत-गाजत देवमळ्यातील भक्तांच्या विहिरीवर आणतात.
या ठिकाणी बाहेरगावच्या भाविकांची देवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यासाठी अलोट गर्दी होते. पारंपरिक वाद्याच्या गजरात व भंडारा उधळून सदानंदाचा येळकोटाच्या जयघोषात येथील सोमवतीच्या ओट्यावर देवाच्या पंचधातूच्या मुखवट्याला सोमवतीचे मानकरी तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील नरके आडनावाच्या मंडळींकडून प्रथम स्नान घालण्यात येते.
त्यानंतर गावडे, पडवळ, आवटे, पंचरास, राजगुरू इत्यादी मानकर्यांकडून व उपस्थित महिला, तसेच पुरुष भाविकांकडून मंत्रघोषात शाही स्नान घालण्यात येत असल्याचे खंडोबाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, ज्ञानेश्वर जाधव, दिनेश जाधव, शांताराम भगत, प्रभाकर भगत, राजेश भगत यांनी सांगितले.
या भक्तांच्या विहिरीवरील सोमवतीच्या पुरातन ओट्याची ग्रामस्थांकडून अनेकदा दुरुस्ती करण्यात आलेली होती. परंतु, या विहिरीवरील काळ्या मातीमुळे ओटा वारंवार ढासळत असल्याचे बांधकाम कारागिरांच्या निदर्शनास आलेले होते. त्यामुळे भाविक व ग्रामस्थांच्या मागणीनुसार बांधकाम तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येऊन सोमवतीच्या या ओट्याचे बांधकाम पूर्णपणे आरसीसीमध्ये भक्कम करून व चोहोबाजूनी सुरक्षिततेसाठी लोंखडी ग्रिलिंग करणे व ग्रँनाईटचा वापर करून अद्ययावत करण्याचा व संपूर्ण ओट्यावर लोंखडी पत्र्याचे आकर्षक शेड करण्यात येणार आहे. सोमवतीचा ओटा बांधकाम व शेड कामाच्या पूर्ततेसाठी सोमवतीचे मानकरी मंडळी व पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ लोकवर्गणीतून सहकार्य करणार असल्याचे भगत मंडळी व वाघे वीर मंडळींनी सांगितले.