कागल; बा. ल. वंदुरकर : कागल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 121 प्राथमिक शाळांपैकी दहा शाळा एक शिक्षकी तर 24 शाळा द्वी शिक्षकी आहेत. जवळच्या मोठ्या शाळेमध्ये या कमी पटाच्या शाळा समाविष्ट का केला जात नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
कागल तालुक्यामध्ये खासगी शाळा तसेच इंग्लिश मीडियम या शाळांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. अनेक मोक्याच्या ठिकाणी शाळांचे प्रस्ताव मंजूर करून शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. खासगी शाळेसाठी विद्यार्थी आहेत मात्र सरकारी शाळेसाठी शोधावे लागत आहेत. वाड्यावस्त्यांमधील शाळेमध्ये तर विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. मुलांची संख्या लक्षात घेता कमी पटाने दोन ऐवजी एकच शिक्षक कार्यरत आहे. कागल तालुक्यात एक शिक्षक कार्यरत असलेल्या शाळांची संख्या एकूण दहा आहे, तर द्वी शिक्षक असलेल्या शाळांची संख्या 24 इतकी आहे.
करनूरच्या उर्दू शाळेमध्ये पाच विद्यार्थी आहेत. हळदी विद्या मंदिर शाळेमध्ये पटसंख्या 18 आहे. सावतवाडीमध्ये 12 तर निवळे वसाहतीमध्ये नऊ विद्यार्थ्यांचा पट आहे तर काही द्वी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. हळदवडे विद्या मंदिरमध्ये 55 विद्यार्थी आहेत तर सिद्धनेर्ली नदीकिनारा शाळेमध्ये 27 विद्यार्थ्यांची संख्या आहे.
तालुक्यातील द्वी शिक्षक असलेल्या शाळा फराकटेवाडी, कुंभारवाडा, बोरवडे, सावर्डे पैकी बहिरेवाडी, खडकेवाडा पैकी कदमवाडी, मुगळीपैकी सांगलीवाडी, कुरुकली पैकी हंबीररावनगर, यमगे पैकी कुंभार गेट, शिंदेवाडी पैकी महावीरनगर, कसबा सांगाव – वाडदे वाकी, आवटे मळा, पिंपळगाव-यादववाडी, हुन्नूर-शंकरवाडी, शेंडूर – माळवाडी, नदीकिनारा – उर्दू, करनूर-सावंतवाडी, बेलवळे खुर्द पैकी सावंतवाडी, रामपूरवाडी, बेरडवाडी, अलाहाबाद, अवचितवाडी, दौलतवाडी अशा 24 गाव – वाड्या वस्त्यांमध्ये द्वीशिक्षकी शाळा भरत आहेत. या शाळेमधील काही विद्यार्थ्यांना बाजूच्या शाळेत किंवा खासगी क्लासेसचा आधार घेत शिकावे लागत आहे.