नाशिक : जपावं किती सौभाग्य लेणं, सरता सरे ना चोरट्यांचं विघ्न | पुढारी

नाशिक : जपावं किती सौभाग्य लेणं, सरता सरे ना चोरट्यांचं विघ्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरट्यांनी महिला, वृद्धांना लक्ष करीत त्यांच्याकडील दागिने ओरबाडून किंवा चलाखीने नेण्याचे प्रकार वाढले आहेत. यापैकी सातपूर पोलिसांनी एका चोरट्यास पकडून चार गुन्हे उघडकीस आणले असले तरी इतर गुन्ह्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे अजूनही दागिन्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह कायम असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याचे प्रकार शहरात काही दिवसांत वाढले आहेत. यात सातपूरच्या हद्दीत चार, भद्रकालीच्या हद्दीत दोन, गंगापूर, पंचवटी, म्हसरूळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यापैकी सातपूर पोलिसांनी एका संशयितास पकडून सुरुवातीस तीन व त्यानंतर एक असे एकूण चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. हा संशयित एकटाच जबरी चोरी करत असल्याचे आढळून आले. मात्र, इतर गुन्ह्यांमध्ये नागा साधू बनून आलेल्या संशयिताने एका वृद्धाचे दागिने ओरबाडून नेले, तर दुचाकीवरून येणारे दोन चोरटे अद्याप पोलिसांना सापडलेेले नाहीत. सकाळी, दुपारी व सायंकाळच्या सुमारास निर्मनुष्य रस्त्यात किंवा रहदारी कमी असणार्‍या मार्गांवर चोरटे जबरी चोरी करताना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिस मुख्य मार्गांवर आणि चोरटे कॉलनीतील रस्त्यांवर असल्याचे बोलले जात आहे.

पंधरा दिवसांत 12 तोळे दागिने लंपास
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांना चोरट्यांचा शोध लागलेला नाही. गेल्या पंधरा दिवसांत चोरट्यांनी तीन लाख 91 हजार रुपयांचे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोबाइल ओरबाडून नेला आहे. त्यापैकी चार गुन्हे उघडकीस आले असून, इतर गुन्ह्यांतील चेारट्यांचा शोध सुरू आहे.

Back to top button