नाशिक : शहरातील सर्वत्र रस्त्यांची लागली ‘वाट’ | पुढारी

नाशिक : शहरातील सर्वत्र रस्त्यांची लागली ‘वाट’

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
भाविक आणि पर्यटकांचा राबता असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी तर केवळ खड्डेच दिसत असून, वाहनधारकांना रस्ता शोधावा लागत आहे.

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकमार्गे देशभरातून भाविक येत असतात. गत दीड-दोन महिने नाशिक-त्र्यंबक परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने व श्रावण महिन्यात या मार्गावरून किमान 25 लाख भाविक येऊन गेल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तसेच दररोज हजारो वाहने धावतात. शनिवार, रविवार, शासकीय सुट्टी व सणावाराला त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याव्यतिरिक्त याच रस्त्याने जव्हार, गुजरात, दमण या मार्गावरील वाहतूकदेखील सुरू असते. त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा आहे. असे असताना रस्ता दुरुस्तीबाबत अद्याप कोणत्याही हाचलाली नसल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

मंत्र्यांची वाट पाहावी लागणार का? : 21 जून जागतिक योगदिनानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरला येणार होते. तेव्हा रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र, ती अत्यंत वरवरची असल्याने पहिल्याच पावसात ती निघून गेली. त्यामुळे डागडुजीसाठी पुन्हा मंत्र्यांच्या दौर्‍याची वाट पाहायची का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची गरज आहे. पेगलवाडी फाट्याच्या पुढे रस्त्याची दशा अधिकच वाईट आहे. विशेष म्हणजे येथे समोरच सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय आहे. तरीदेखील रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष जात नसल्याचे आश्चर्य वाटते. रस्त्याची दुरवस्था सुधारली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. – रामनाथ बोडके, पदाधिकारी, युवा सेना, त्र्यंबकेश्वर.

हेही वाचा:

Back to top button