स्वीच HIT : प्रायोगिक रंगभूमीचा पडदा पडला

स्वीच HIT : प्रायोगिक रंगभूमीचा पडदा पडला
Published on
Updated on

भारतीय संघ आशिया चषकाला सामोरा गेला तो म्हणजे हा चषक आपलाच आहे फक्‍त काही सामने खेळायची औपचारिकता आहे, या थाटात. सात वेळा चषक जिंकला आहे आणि आता आठवी खेप असे चित्र अगदी जाहिरातूनही दाखवत होते. असं वाटायला कारणही सबळ होते, कारण भारत म्हणजे क्रिकेटची महासत्ता.

देशातील राजकीय होरपळीचा फटका, आर्थिक आणि सरावाच्या अभावाच्या द‍ृष्टीने बसलेले अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, लिंबूटिंबू हाँगकाँग आणि बेतास बात बांगलादेश यांचा विचार करता भारतीय संघ खरोखर महासत्ताच होता, पण आज ही महासत्ता आशिया चषकातून जवळपास बाहेर पडल्यासारखी आहे. सातत्याचा अभाव या सुपर फोरच्या दोन पराभवातही प्रामुख्याने दिसून आला. सूर्यकुमार यादव, कोहली, रोहित शर्मा, पंत आणि पंड्या हे फलंदाजीतील सातत्य राखू शकले नाहीत. मुळात भारतीय संघ हे सामने प्रायोगिक नाटकासारखे खेळला.

विजयाच्या रूपाने उत्पन्‍न नाही मिळाले तरी चालेल पण प्रायोगिकता थांबता कामा नये. याउलट पाकिस्तान आणि श्रीलंका व्यावसायिक नाटकासारखे धंद्याचे गणित बघून खेळत आहेत. रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला की, आम्हाला ड्रेसिंग रूमचे वातावरण चांगले ठेवायचे आहे. जिंकण्याचा आणि हरण्याचा फरक पडत नाही. या पराभवानंतरही तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये बघितले तर खेळकर वातावरण आहे. आम्ही परिश्रमाने हे केले आहे आणि विश्‍व चषकापर्यंत आम्हाला हे टिकवायचे आहे.

याउलट मला पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-फोर मधल्या पराभवानंतरची मोहम्मद रिझवानची मुलाखत जास्त सच्चेपणाची वाटली. यष्टिरक्षण करताना दुखापत झाल्यावरही जिंकायच्या ईर्ष्येने तो खेळला. चेतन शर्माच्या अध्यक्षतेखाली असलेल्या हरविंदर सिंग, देबाशिष मोहंती आणि सुनील जोशी प्रभृतींनी विश्‍व चषकाचे नियोजन करायला दूरद‍ृष्टीने संघ निवड करायला हवी होती.

दुबईत खेळताना गेल्या दोन वर्षांत हाँगकाँग आणि स्कॉटलंड सोडून कुणीही धावसंख्येचा पाठलाग करताना हरलेले नाही. इथे दव पडत नाही, दुसर्‍या डावात चेंडू बॅटवर अधिक चांगला येतो, हे माहीत असताना संघ निवड त्याद‍ृष्टीने व्हायला पाहिजे होती. या दोन्ही पराभवात आपल्याला 15-20 धावा कमी पडल्या. राहुलचे अपयश, बाकीच्यांचा सातत्याचा अभाव आणि घणाघाती फलंदाजी करू शकणारे तळाच्या अष्टपैलूंचा अभाव आपल्या संघात दिसला. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक द्रविडचे डावपेच कळण्याच्या पलीकडचे होते. सततच्या प्रयोगांनी आठवण होते ती 2019 च्या विश्‍व चषकाची.

विश्‍व चषकाच्या संघातील चौथ्या क्रमांकाचा दावेदार म्हणून अंबाती रायडूला 24 सामने खेळवून, विजय शंकरचा प्रयोग केला जो पुरता फसला. ट्वेन्टी-20 विश्‍व चषकाला अजून दीड महिना बाकी आहे. थिंक टँकने हे प्रयोग थांबवून विश्‍व चषकाच्या अंतिम संघाला यापुढे जिथे मिळेल तिथे सराव देणे गरजेचे आहे. या प्रायोगिक रंगभूमीचा पडदा आशिया चषकात पडला आहेच, पण हे असेच चालले तर विश्‍व चषकाच्या अंतिम सामन्याचे स्टेज मिळणेही कठीण जाईल.

  • निमिष पाटगावकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news