नाशिक : तो पोहत काठावर पोहोचण्यापूर्वीच मृत्यूने त्याला कवटाळले
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शिवाजीनगरमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२८) अस्पायर क्लबमध्ये घटना घडली आहे.
जयेश भारत भावसार (१९ रा. मोठाभाऊ नगर, सोयगाव) असे मयताचे नाव असून जयेश हा मित्र जयेश रविंद्र पगारे (रा. गिरणा स्टीलजवळ, सोयगाव) समवेत रविवारी (दि.२८) दुपारी १२ वाजता स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला असता त्याने पाण्यात सूर मारला. पोहत असताना दुसऱ्या बाजूपर्यंत तो झेपावत गेला. दुसरा तरुणही त्यामागे झेपावला. भावसार काठावर पोहोचल्यानंतर तो काही काळ तिथेच पाण्यातच वर-खाली होत राहिला. त्याला दम लागला. मित्रांनी त्याला पाण्याबाहेर खेचले. तसेच एका मित्राने छाती दाबून, तोंडाद्वारे श्वास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, भावसार बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, दुर्दैवाने तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार के. पी. पवार हे चौकशी करत आहेत. जाणकारांच्या मते हा मृत्यू तीव्र हार्टस्ट्रोकमुळे झालेला असावा. स्विमिंगपूर्वी वाॅर्मअप, थोडे सायकलींग करुन शरीर गरम करणे गरजेचे असते. पाण्यात उतरण्यापूर्वी शॉवर घ्यावा. रक्ताभिसरण क्रिया सुस्थितीत आल्यावरच स्विमिंगला प्रारंभ केल्यास त्रास होत नाही, असे सांगण्यात येत आहे.