नाशिक – औरंगाबाद महामार्गावर मालवाहू रिक्षा व स्कूल बसची धडक, दोघे गंभीर | पुढारी

नाशिक - औरंगाबाद महामार्गावर मालवाहू रिक्षा व स्कूल बसची धडक, दोघे गंभीर

नाशिक, गोंदेगांव : प्रतिनिधी
नाशिक – औरंगाबाद महामार्गावर भरवस फाटा हद्दीत जे.के.प्राईड लॉन्स जवळ आज (दि. १९ ) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शेतमाल वाहतूक रिक्षा आणि स्कूल बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, येवल्याहून विंचूरकडे कांदे घेऊन जाणारी मालवाहू रिक्षा क्रमांक एम. एच. 15 सीके 8920 आणि विंचूरच्या दिशेने येवल्याच्या दिशेकडे येत असलेली स्कूल बस एम. एच. 15 एके 902 यांच्यात भीषण अपघात होऊन मालवाहू रिक्षा मधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने लासलगाव पोलिसांनी जखमींना उपचारासाठी पुढे पाठविले.
नाशिक व औरंगाबाद महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला जाणारी व येणारी वाहने या ठिकाणी एकाच बाजूने जात असताना हा अपघात झाला. रिक्षाच्या नंबर वरून रिक्षामालकाचे नाव संतोष लांडगे असे असून येवला तालुक्यातील ममदापूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमी झालेले व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. या घटनेची माहिती सुरुवातीला लासलगाव पोलिसांना मिळाल्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, बीट हवालदार लासुरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Back to top button