नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल | पुढारी

नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल

देवळा/लोहोणेर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कळवण – देवळा तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले. गिरणा नदीला आलेल्या महापुरात नदीकाठावरील शेतांमध्ये पुरांचे पाणी घुसले. त्याचा फटका उभ्या पिकांना बसला. महसूल विभागाने पंचनामेही केले. परंतु, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने नुकसानग्रस्तांचे शासनाकडे लक्ष लागले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे दुसर्‍यांदा नुकसान झाले. गिरणा नदीला आलेल्या महापुरात विठेवाडी शिवारातील नदीकाठावरील विहिरी पूरपाण्यात खचल्या. काही विहिरी बुडाल्या, तर आरसीसी बांधकाम केलेल्या विहिरीच्या रिंगा तुटून कोसळल्या. दि. 25 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने विठेवाडी शिवारातील माजी सरपंच रावसाहेब संपत निकम यांच्या शेतात पूरपाणी घुसून संपूर्ण विहीर खचली. अंदाजे 70 ते 75 फूट खोल असलेली बांधलेली संपूर्ण विहीर दबली गेली. सुमारे दोन लाख रुपये खर्च करून बांधलेल्या विहिरीचा पंचनामा झाला. महसूल विभागाने तत्काळ वरिष्ठ पातळीवर पाहणी करावी व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

गत महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीच्या काठावरील शेतांमध्ये पुरांचे पाणी घुसले. त्यामुळे शेतीचे, उभ्या पिकांचे तसेच विहिरीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामेही केले, परंतु नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.
– कुबेर जाधव
समन्वयक, स्वाभिमानी
शेतकरी संघटना, नाशिक

हेही वाचा :

Back to top button