विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाई; वाहन परवाना नसल्याने बारामती येथे उगारला बडगा | पुढारी

विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाई; वाहन परवाना नसल्याने बारामती येथे उगारला बडगा

बारामती; पुढारी वृत्तसेवा: वाहन चालविण्याचा परवाना नसताना शाळा व महाविद्यालयांत दुचाकीवरून येणार्‍या विद्यार्थ्यांवर बुधवारी (दि. 17) बारामती शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. तरीही त्यांचे पालक त्यांना दुचाकीवरून महाविद्यालयात जाण्यास परवानगी देतात. बारामतीतील बहुतांशी महाविद्यालये दोन सत्रात चालतात. हे विद्यार्थी विना क्रमांकाची दुचाकी आणतात.

शिवाय शाळा-महाविद्यालय परिसरात दुचाकीचा मोठा आवाज करत फिरत असतात. त्यांच्यावर यापूर्वी ही निर्भया पथकाकडून कारवाई करण्यात आली होती; परंतु वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक घोडके व कर्मचार्‍यांची चार पथके एकाच वेळी तयार करण्यात आली.

या पथकांनी शहरातील टी. सी. महाविद्यालय, अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल, राधेश्याम आगरवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धों. आ. सातव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी साध्या वेषात जात शाळा- महाविद्यालय सुटण्या वेळी विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचे परवाने आहेत का, याची तपासणी केली. या वेळी अनेकांकडे परवाना नसल्याचे दिसून आले. शाळा-महाविद्यालय प्रशासनाला तसेच पालकांनाही पोलिसांकडून कारवाईची माहिती देण्यात आली.

शाळा-महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनीकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना त्यांना वाहने दिली जात असतील, तर अशा विद्यार्थ्यांच्या पालकांवर यापुढे कारवाई केली जाईल. अनेक पालक स्वयंचलित दुचाकी पाल्यांना देत आहेत. पालकांच्या नावे वाहतुकीचा दंड टाकला जाईल. विनाक्रमांकाची दुचाकी सापडल्यास पाच हजार दंड केला जाणार आहे.

                                     – सुनील महाडीक, पोलिस निरीक्षक, बारामती शहर

 

Back to top button