नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी 12,623 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी उत्सुकता लागलेली पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि.2) जाहीर झाली. या फेरीसाठी 12 हजार 623 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये कला शाखेतील 2 हजार 81, वाणिज्य शाखेच्या 4 हजार 218, विज्ञान शाखेच्या 6 हजार 177, तर एचएसव्हीसी शाखेच्या 147 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (दि.6)पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
शहरातील 63 कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामध्ये कला शाखेच्या 4 हजार 406, वाणिज्य शाखेच्या 7 हजार 591, विज्ञान शाखेच्या 9 हजार 206, तर एचएसव्हीसी शाखेच्या 950 जागांचा समावेश आहे. पहिल्या गुणवत्ता यादीसाठी 12 हजार 623 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात राज्य शिक्षण मंडळाच्या 11 हजार 915, सीबीएसई बोर्डाच्या 401, तर इतर 307 विद्यार्थ्यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, सध्या कोटांंतर्गत प्रवेश दिले जात आहे. या प्रक्रियेत इन हाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा प्रवेशप्रक्रियेत 746 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 383 प्रवेश हे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे आहेत. इन हाउस कोट्यातील जागांवर 360 विद्यार्थ्यांचे, तर व्यवस्थापन कोट्यातून 3 प्रवेश निश्चित झाले आहेत. आतापर्यंत इन हाउस कोट्यातील 2,271, अल्पसंख्याक कोट्यातील 1,240, तर व्यवस्थापन कोट्यातील 816 जागा ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
‘कटऑफ’ वाढला
एचपीटी-आरवायके महाविद्यालयात विज्ञान शाखेचा खुल्या प्रवर्गातील कटऑफ सर्वाधिक 91.20 टक्के लागला आहे. त्यानंतर बीवायके महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा 87.40 टक्के कटऑफ जाहीर झाला आहे. शहरातील सर्वच महाविद्यालयांमधील कला शाखेचा कटऑफ 60 ते 80 टक्के आहे.
महाविद्यालय निहाय ‘कटऑफ’
महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान
एचपीटी – आरवायके 404 — 423
बीवायके — 391 388
बॉइज टाउन — 390 401
केटीएचएम 373 350 387
केव्हीएन नाईक 355 343 404
पंचवटी 354 361 320
नाशिकरोड बिटको 302 360 356