बोरीचा बार : 300 हून अधिक महिलांनी एकमेकींना हातवारे करत वाहिली शिव्यांची लाखोली | पुढारी

बोरीचा बार : 300 हून अधिक महिलांनी एकमेकींना हातवारे करत वाहिली शिव्यांची लाखोली

लोणंद : शशिकांत जाधव सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावातील सुमारे 300 महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास बोरीचा बार घालून परंपरा सुरू ठेवली. यावेळी महिलांना सावरताना पोलिसांना कसरत करावी लागत होती. सुखेड व बोरी या गावातील महिला गेली अनेक वर्षापासून नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी दोन्ही गावाच्या दरम्यान जाणार्‍या ओढ्यात येऊन शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्याची परंपरा आहे. कोरोनानंतर यावर्षी बोरीचा बार कसा होणार याची उत्सुकता सर्वानाच होती. त्यामुळेच मिळेल त्या वाहनाने पंचक्रोशीबरोबर इतर तालुका व जिल्ह्यातील हौशी बोरी गावात पोहचत होते.

यावर्षी गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बोरी व सुखेडमधून जाणार्‍या ओढ्याला पाणी वाहत आहे. त्यामुळे बोरीचा बार रंगणार असल्याचे सकाळपासूनच बघ्यांच्या गर्दीने दिसून येत होते. जसा बाराचा ठोका ओलांडला तसा लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर व त्यांचे सहकारी, महिला पोलीसांनी आपली जागा घेत बघ्यांना मागे हटवण्यास सुरुवात केली. दुपारी 12.10 वाजण्याच्या सुमारास सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग आदी वाद्यांसह वाजत गाजत ओढ्याच्या तीरावर येऊन हातवारे व टाळ्या वाजवत बार घालू लागल्या. त्यावेळीच बोरी गावातील काही उपस्थित महिलांनीही हातवारे करत बार घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर बोरी गावातील महिला वाजत गाजत येऊन बोरीचा बार घालू लागल्या.

दोन्ही बाजुच्या माहिलांनी एकमेकांना हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. ओढ्यामध्ये पाणी असल्याने बार घालणार्‍या महिला बरोबरोबरच बघ्यांना आवरताना पोलीस, ग्रामस्थ यांची मोठी धांदल उडत होती. वाद्यांचा आवाज आणि बघ्यांची गर्दी महिलांना चिथावणी देत होती. बोरीच्या बारात अबाल वृद्धासह 300 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. पाऊण तास बोरीचा बार घालणार्‍या महिलांना मागे ढकलत बार कमी होण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी वाद्ये बंद करण्यास भाग पाडल्यानंतरही महिला टाळ्या वाजवत हातवारे करत शिव्या देत पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. बोरीच्या बारानंतर सुखेड व बोरी गावामधील महिलांनी गावात जाऊन झिम्मा फुगडी, फेर धरणे आदी खेळ खेळले.

Back to top button