चंदीगड : हल्ली सोशल मीडियावर काय पाहायला मिळेल आणि काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी एका फूड ब्लॉगरने 'डिझेल पराठा'चा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परंतु त्यानंतर जे घडले, त्यामुळे त्या फूड ब्लॉगरला माफी मागावी लागली. तसेच संबंधित हॉटेलच्या मालकास स्पष्टीकरण द्यावे लागले.
हा व्हायरल व्हिडीओ चंदीगडमधील एका रस्त्यावरील हॉटेलचा होता. हा फूड ब्लॉगर जेवणासाठी चंदीगडमध्ये या ढाब्यावर किंवा हॉटेलवर गेला. त्या ठिकाणी पराठा बनवणार्या व्यक्तीला पाहून तो थांबला आणि त्याने व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडीओ शूट झाला. परंतु त्याला सोशल मीडिवर व्हायरल करण्यासाठी 'डिझेल पराठा' नाव दिले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मात्र फूड ब्लॉगरच्या अडचणी सुरू झाल्या.
व्हिडीओमध्ये फूड ब्लॉगर हा पराठा डिझेलमध्ये भाजला जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यासंदर्भात चिंता निर्माण झाली. त्या व्हिडीओत हॉटेल मालक डिझेल पराठा बनवत असल्याचे म्हणताना दिसत होतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच गदारोळ माजला. सोशल मीडिया यूजर्सकडून आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त करणार्या प्रतिक्रिया आल्या. डिझेलचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले गेले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी झाली.
सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे कायदेशीर कारवाई होण्याचा धोका फूड ब्लॉगरपुढे होता. त्यामुळे त्याने हा व्हिडीओ डिलिट केला. तसेच दुसरा व्हिडीओ टाकून लोकांची माफी मागितली. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी टाकला गेला होता, हॉटेलमध्ये डिझेलचा वापर केला जात नव्हता, असे सांगण्यात आले. हॉटेलच्या मालकाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. आम्ही केवळ खाद्यतेलाचा वापर करतो आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचे जेवण देतो, असे हॉटेलचा मालक म्हणताना व्हिडीओत दिसतो. या व्हिडीओनंतर यूजर्सकडून अनेक कमेंट करण्यात आल्या.