धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन | पुढारी

धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साक्री तालुक्यातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. शासकीय यंत्रणेलाही दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे, साक्री तालुक्यातील मालनगाव मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाण्याची आवक लक्षात घेता मालनगाव मध्यम प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मालनगाव धरणाखालील बाजूस असलेल्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. कान नदी पात्रामध्ये कुणीही गुरे- ढोरे सोडू नयेत अथवा कोणीही नदी पात्रामध्ये जाऊ नये.

तसेच पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्प व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी सतत वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासांत पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पांझरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात गुरे- ढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावेत.

याशिवाय मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही तालुक्यांमधे पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लहान नदी, नाले भरुन वाहत आहेत. जिल्हा परिषद तसेच जलसंपदा विभागाचे पाझर तलाव भरलेले असतील. या पाझर तलावांच्या सांडव्यातून पाणी वाहून न गेल्यास तलाव फुटुन जीवित हानी तसेच शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे सर्व तहसीलदार आणि त्यांच्या अधिनस्त यंत्रणेस पाझर तलाव सुस्थितित असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी दक्ष राहत समन्वय ठेवावा, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button