नाशिक : सिंहस्थ पर्वाचा शंखनाद ; कुशावर्त येथे गंगापूजनानंतर पर्वणीच्या तारखा जाहीर | पुढारी

नाशिक : सिंहस्थ पर्वाचा शंखनाद ; कुशावर्त येथे गंगापूजनानंतर पर्वणीच्या तारखा जाहीर

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधत गंगा-गोदावरी मंदिराच्या प्रांगणात साधू-महंत, पुरोहितांनी आगामी सिंहस्थ 2026-27 च्या तारखा जाहीर केल्या. आगामी सिंहस्थाचा पर्वकाल प्रदीर्घ असून, 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 असा तीन वर्षांदरम्यान आहे. पहिले शाही स्नान दि. 2 ऑगस्ट 2027 ला होणार आहे.

षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषद महामंत्री श्रीमहंत हरिगिरी महाराज, कोशाध्यक्ष शंकरानंद सरस्वती, महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, विष्णुगिरी, सुखदेव गिरी, इच्छागिरी उपस्थित होते. साधू-महंतांनी कुशावर्त येथे स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन सिंहस्थाचा संपूर्ण कालावधी जाहीर केला.

जुना आखाड्याचे पुरोहित त्रिविक्रम जोशी, पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष मनोज थेटे, प्रवक्ते राजेश दीक्षित यांनी ज्योतिषशास्त्राच्या आधारे शाहीस्नानाच्या तिथी जाहीर केल्या. 60 वर्षांनंतर असा पर्वकाल योग आला आहे. प्रशासनाला सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून चार वर्षे अगोदर तारखा जाहीर करीत असल्याचे महंत हरिगिरी महाराज यांनी स्पष्ट केले. राजेश दीक्षित यांनी आगामी सिंहस्थ 2026-27-28 असा त्रिखंड कालावधीत विभागला असल्याचे सांगितले. सिंहस्थ पर्वकाल 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 या प्रदीर्घ कालावधीत आहे. यामध्ये कालावधी खंडित झालेला आहे. असा योग शतकातून एकदाच येतो. गत शतकात 1968 मध्ये असा सिंहस्थ पर्वकाल होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुख्याधिकारी संजय जाधव, त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, आरोग्य सभापती सागर उजे, बांधकाम सभापती दीपक लोणारी, कैलास चोथे, विश्वस्त भूषण अडसरे यांच्यासह रवींद्र सोनवणे, नितीन रामायणे उपस्थित होते. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी नगर परिषदेच्या वतीने सिंहस्थ नियोजन सुरू झाले आहे. तसेच सिंहस्थ सुविधा विकासकामांचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. साधू-महंत, मान्यवरांच्या हस्ते कुशावर्त सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.

असे आहेत मुहूर्त (तिथी, वार आणि दिनांकासह)

  1. सिंहस्थ ध्वजारोहण प्रारंभ – अश्विन वद्य षष्ठी, शनिवार, 31 ऑक्टोबर 2026
  2. प्रथम शाहीस्नान-आषाढ कृष्ण अमावास्या, सोमवार, 2 ऑगस्ट 2027
  3. द्वितीय शाहीस्नान-श्रावण वद्य अमावास्या, मंगळवार, 31 ऑगस्ट 2027
  4. तृतीय शाहीस्नान-भाद्रपद शुद्ध द्वादशी, रविवार, 12 सप्टेंबर 2027
  5. ध्वजावतरण समाप्ती-श्रावण शुद्ध तृतीया, सोमवार, 24 जुलै 2028

हेही वाचा :

Back to top button