पुण्यासह आठ शहरांतील घरांच्या विक्रीत वाढ | पुढारी

पुण्यासह आठ शहरांतील घरांच्या विक्रीत वाढ

पुणे : घरांच्या वाढीव किंमती आणि व्याजदरातील वाढ असूनही एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील पुण्यासह प्रमुख आठ शहरांतील निवासी प्रकल्पातील घरांच्या विक्रीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोरोना काळानंतर प्रामुख्याने घर खरेदीदारांमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक स्थैर्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास दुणावला आहे, हे या खाजगी सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल- एप्रिल-जून 2022 या प्रॉपटायगरच्या अहवालात अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली- राजधानी परिसर व पुणे यांचा समावेश आहे. 30 जून रोजी समाप्त तिमाहीदरम्यान घरांच्या विक्रीत मागील तिमाहीच्या (कॅलेंडर वर्ष 2022 ची पहिली तिमाही) तुलनेत अनुक्रमिक 5 टक्के वाढ दिसून आली.

आघाडीच्या आठ बाजारपेठांमध्ये 2022 सालातील दुसर्‍या तिमाहीत 74,330 घरे विकली गेली. पहिल्या तिमाहीत हा आकडा 70,620 घरे एवढा होता. सर्वाधिक अनुक्रमिक वाढ अखेरच्या ग्राहकाद्वारे प्रेरित अहमदाबाद व हैदराबाद या बाजारपेठांमध्ये सर्वोच्च म्हणजेच अनुक्रमे 30 टक्के व 21 टक्के एवढी दिसून आली. आरबीआयने पहिल्या तिमाहीदरम्यान दोनदा रेपो दरात वाढ करून तो 4.90 टक्क्यांवर आणला असला, तरीही विश्लेषण केलेल्या कालखंडादरम्यान गृहकर्जे प्रामुख्याने परवडण्याजोगी राहिली आहेत. त्यामुळे ग्राहक घर खरेदीसाठी वळत आहेत, असे प्रॉपटायगरचे ग्रुप सीएफओ विकास वाधवान यांनी सांगितले.

Back to top button