धुळे : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भामट्यास अटक | पुढारी

धुळे : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भामट्यास अटक

धुळे; पुढारी वृत्तसेवा : नॅशनल स्क्रॅप फर्मच्या माध्यमातून गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून धुळ्यात अनेकांना गंडा घालणाऱ्या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथून अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोघा आरोपींनी ६ जणांची २ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान नागरिकांनी असुरक्षित पद्धतीने संस्था चालवणाऱ्यांकडे ठेवी ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे : जे. पी. नड्डा

धुळे येथे राहणारे उबेद अहमद उर्फ अहमद जमील शेख तसेच जुनेद शेख या दोघांनी पूर्वनियोजित कट केला. यात जुनेद शेख याने नॅशनल स्क्रॅप फर्मच्या माध्यमातून धुळ्यातील नागरिकांना गुंतवणूक केल्यास त्यातून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. स्क्रॅप मालाची व एअरक्राफ्टच्या भंगारमालाची डील करणार असल्याची बतावणी करून चुकीची माहिती देण्यात आली. यात गुंतवणूक केल्यास सहा महिन्याच्या आत गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या ५० टक्के नफ्याने परतावा देण्याचे सांगून आकर्षित करण्यात आले.

या कटकारस्थानात आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून गुंतवणूकदारांवर संपर्क ठेवला असल्याचे निदर्शनास आले. यातील आरोपी जुनेद शेख व त्याचा भाऊ इद्रिस शेख आणि त्याच्या काही नातेवाईकांनी देखील या गुन्ह्याला गुन्ह्याची व्याप्ती वाढवण्याचा अंदाज आहे.

आरोपी यांनी गुंतवणूकदारांचा फोन आल्यावर त्याचक्षणी त्याच्या इतर नातेवाईकांना फोन करून गुंतवणूकदार आणि नातेवाईक यांचे बोलणे करून देण्याचे तंत्र सुरू केले. यासाठी वेगवेगळ्या बनावट नावांचा वापर करण्यात आला. आतापावेतो फैसल भाई मेमन, हायात मेमन, अब्रार मेमन, राजेंद्र गुजराती या नावाने बोलून गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना आश्वासित करण्याचे काम केले. मात्र कोणत्याही परिस्थितीत परतावा मिळत नसल्याचे पाहून एका तक्रारदाराने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या प्रकारची माहिती दिली.

इतिहास राज्यातील सत्तांतराचा : विविध कारणांमुळे ‘या’ मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले होते राजीनामे

या रकमा फर्मच्या बँक खात्यावर व रोखीने स्वीकारण्यात आल्या. प्रथमदर्शनी एका पीडित गुंतवणुकदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्याची १ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, उबेद अहमद उर्फ इद्रिस जमील शेख हा जळगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर तसेच हिरालाल ठाकरे गयासुद्दीन शेख, रवींद्र शिंपी आदींनी जळगाव येथील अजंठा चौफुलीवर सापळा रचून उबेद अहमद याला अटक करण्यात आली.

यासंदर्भात माहिती देत असताना पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे हे देखील उपस्थित होते. या गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आणि क्लिष्ट स्वरूपाची आहे. त्यामुळे फसवणुकीची रक्कम वाढत आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जुनेद शेख याने अतिशय थंड डोक्याने या गुन्ह्याचा कट रचला असून त्याने २०१७ पासून आज पावतो वेगवेगळे मोबाईल तसेच सिमकार्ड वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तसेच जुनेद शेख याने या गुन्ह्याची तक्रार देणारा तसेच इतर गुंतवणूकदार यांना वेळोवेळी पैसे परत करण्याचे आमिष दाखवून त्यांना सुरत, मुंबई, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर समोरील पार्टीशी माझे बोलणे सुरू आहे. तसेच थोड्याच दिवसात समोरील लोक पैसे घेऊन येणार असल्याच्या भूलथापा दिल्या. मात्र, यानंतर तो पसार झाला. असेदेखील पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी सांगितले. धुळे शहरातील जनतेने असुरक्षितपणे संस्था चालवणाऱ्या कोणत्याही ठिकाणी ठेवी ठेवू नये, तसेच फसवणूक झाली असल्यास तातडीने पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button