नाशिक : सातबारा बालाजी देवस्थानमुक्त, महसूलचा वीस हजार शेतकर्‍यांना दिलासा | पुढारी

नाशिक : सातबारा बालाजी देवस्थानमुक्त, महसूलचा वीस हजार शेतकर्‍यांना दिलासा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

देवळाली मतदारसंघातील पाच गावांतील शेतकर्‍यांच्या उतार्‍यावरील नाशिकच्या बालाजी देवस्थान ट्रस्टची नोंद लवकरच रद्द करण्याचे आदेश काढले जाणार आहे. या संदर्भात महसूल विभागाने आवश्यक परिपत्रक काढले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची लवकरच अंमलबजावणी होईल. त्यामुळे जवळपास सतरा ते वीस हजार शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सन 1972 मध्ये शासकीय परिपत्रकानुसार देवळाली मतदारसंघातील विहितगाव, बेलतगव्हाण, मनोली आदी गावांतील शेतजमिनीवरील उतार्‍यांवर बालाजी देवस्थान ट्रस्ट या नावाने नोंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना जमीन खरेदी-विक्री करताना बालाजी देवस्थान ट्रस्टला दिवाबत्तीच्या नावाखाली काही महसूल द्यावा लागत होता. त्याचप्रमाणे जमीन व्यवहारात शेतकर्‍यांना बालाजी देवस्थानचे ना हरकत पत्र घ्यावे लागत होते. मागील अनेक वर्षांपासून मतदारसंघातील शेतकरी आपल्या जमिनीवरील बालाजी देवस्थान ट्रस्टचे नाव हटवावे, यासाठी शासकीय दरबारात लढा देत होते. शेतकर्‍यांना न्याय दिल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची आमदार सरोज आहिरे यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन विठ्ठल-रुख्मिणीची प्रतिमा भेट देत त्यांचे आभार मानले.

देवळाली मतदारसंघातील काही गावांच्या उतार्‍यांवरील बालाजी देवस्थान ट्रस्टची नोंद रद्द करण्यासाठी विधानसभा सदस्य या नात्याने मी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. शेतकर्‍यांनीही अनेक वर्षे संघर्ष केला. आमच्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने मंगळवारी यासंदर्भात आवश्यक परिपत्रक काढले. आमच्या लढ्याला यश मिळाले असून लवकरच अंमलबजावणी होईल.
– सरोज आहिरे, आमदार

मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आमच्या लढ्याला यश आले. हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी व देवस्थानचे नाव वगळावे.
-विक्रम कोठुळे, शेतकरी

हेही वाचा :

 

Back to top button