जालना : ‘मेट्रो फायनान्स’कडून 20 लाखांची फसवणूक | पुढारी

जालना : ‘मेट्रो फायनान्स’कडून 20 लाखांची फसवणूक

मंठा, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथील मेट्रो फायनान्स कंपनीव्दारे कर्ज उपलब्ध करून देण्याची थाप मारून मंठ्यातील 35 जणांकडून वीस लाख रुपये जमा करून नंतर कर्जही दिले नाही आणि अनामत रक्कमही परत मिळाली नसल्यामुळे मंठ्यातील 35 जणांची वीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

दिल्ली येथील मेट्रो फायनान्स कंपनीचे संचालक संजय चौधरी यांनी मंठा शहरात येऊन आपली कंपनी स्वस्तामध्ये कर्ज देते,अशी थाप मारून अनामत रक्कम 35 जणांकडून 20 लाख रुपयांची रक्कम जमा केली. विशेष म्हणजे मंठा येथीलच अर्चना चाटे या महिलेला या कामासाठी चक्क साठ हजार रुपये महिनावारी नियुक्त करण्यात आले. त्यामुळे कोणालाही याबद्दल संशय आला नाही. अर्चना चाटे यांनी अनामत म्हणून घेतलेली रक्कम फोन पे, तसेच देवगिरी बँकेच्या माध्यमातून आरोपी संजय चौधरी यांच्या खात्यावर जमा केले. कर्जदारांना विश्वास बसावा म्हणून आरोपीने अर्चना चाटे यांच्याकडे सेक्युरिटी म्हणून 13 लाख रुपयांचा चेक दिला होता. मात्र मेट्रो फायनान्स ही कंपनी अनेक दिवसांनंतरही कोणालाही कर्ज देत नाही हे लक्षात आल्यानंतर अर्चना चाटे यांनी त्यांच्याकडे असलेला चेक बँकेत जमा केला असता तो बाऊन्स झाला. त्यामुळे सर्वांचीच फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर चाटे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

Back to top button