गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याचे दहन, जळगावी शिवसैनिकांचे आंदोलन | पुढारी

गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याचे दहन, जळगावी शिवसैनिकांचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले. परंतु आजही कट्टर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश देण्यासाठी तसेच समर्थनार्थ जळगाव आणि धरणगाव शहरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत धरणगाव शहरात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 40 आमदारांनी बंडाचा झेडा फडवल्यानंतर ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखविण्यासाठी शिवसेना महानगराच्या वतीने रॅली काढण्यात आली. गोलाणी मार्केटमधील पक्ष कार्यालयापासून शेकडो शिवसैनिकांनी टॉवर चौकापर्यंत घोषणाबाजी करीत रॅली काढली. यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, सचिन पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्याम कोगटा, संघटक दिनेश जगताप व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलाबराव पाटील हे ऐन संकटात पक्षप्रमुखांना सोडून गेले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे धरणगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाटलांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही कमी पडू दिले नाही, तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.

तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेवक राजेंद्र महाजन, वासुदेव चौधरी, विलास महाजन, जीवन बयस, राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button