भाजपशी सलगी करणार्‍यांनी आमची मापे काढू नयेत : सुहास बाबर | पुढारी

भाजपशी सलगी करणार्‍यांनी आमची मापे काढू नयेत : सुहास बाबर

विटा ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे असूनही भाजपशी सलगी करणार्‍या एखाद्या स्वीकृत माजी नगरसेवकाने आमची मापे काढू नयेत, अशा शब्दात फटकारत, विट्याची अर्धी जनता पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर का अवलंबून आहे, याचे उत्तर द्या, असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना केला.

‘मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघातील लोकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी दिली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी टेंभूच्या नावावर लोकांना बनवू नका, आमदार स्वार्थासाठी कार्यकर्त्यांशी गद्दारी करून पळून गेले, अशी टीका केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर टीका केली. ते पुढे म्हणाले,“ आम्ही कोठेही अंधारात पळून गेलेलो नाही, आम्ही आमच्या पक्षाच्या गटनेत्यासोबत आहोत. गद्दारीचा इतिहास कुणाचा आहे, हे मतदारसंघाला माहीत आहे.

त्यामुळे आमच्यावर टीका करून स्वतःचे हसे करून घेऊ नका. ज्या-ज्या वेळेला पक्ष बदलून आम्ही जनतेसमोर गेलो, त्या-त्या वेळेला जनतेने आमची भूमिका स्वीकारून आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. ते पुढे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. बाबर यांच्या एका पत्रावर सहाव्या टप्प्यासाठी मंजुरी दिली होती. वंचित गावांचा टेंभूत समावेश केला होता. हा सहावा टप्पा कशासाठी रखडला, हा आमचा सवाल आहे.

येत्या काही दिवसात आ. बाबर विट्याला पुरेसा पाणीपुरवठा देणार आहेत. सर्व पक्षातील लोक आमच्या भूमिकेचे स्वागत करीत आहेत. तालुक्याच्या भावना लक्षात घेऊन ही भूमिका घेतलेली आहे, असेही बाबर यांनी म्हटले आहे.

Back to top button