सोलापूर : आसरा समांतर पुलासाठी अतिक्रमित 20 घरे जमीनदोस्त | पुढारी

सोलापूर : आसरा समांतर पुलासाठी अतिक्रमित 20 घरे जमीनदोस्त

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा आसरा चौक ते डी मार्ट समांतर उड्डाणपुलाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महापालिकेतर्फे शुक्रवारी (दि. 24) अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी जुळे सोलापूरकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा असलेली सुमारे 20 अतिक्रमित घरांचे पाडकाम करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती जुळे सोलापूर परिसरातील आसरा चौक ते डी मार्ट रस्त्यावर असलेला रेल्वे पूल अरुंद आहे. त्यात येथून वाहतुकीची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

विशेषत: विजापूर रस्त्याने सिद्धेश्‍वर कारखान्याच्या ऊस वाहतुकीसह विविध प्रकारची अवजड वाहतूकही याच मार्गाने होते. त्यामुळे वारंवार येथे वाहतुकीची कोंडी होते. प्रसंगी लहान-मोठ्या अपघाताने शेकडो वाहने अडकून राहतात. यावर उपाय म्हणून आता येथे समांतर पूल बांधण्याचा निर्णय घेणयत आला आहे. यासंदर्भात रेल्वेकडून आराखडा तयार केला जात आहे. दरम्यान या भागात 24 मीटरचा डीपी रस्ता आहे. या रस्त्यावर अतिक्रमण करुन मोठ्या प्रमाणात अवैधपणे बांधकाम करण्यात आले आहे.

एकूणच नवीन पूल उभारण्यासाठी या घरांचा अडसर होणार असल्याने मनपातर्फे शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी या रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमित 20 घरे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे आता 24 मीटरचा रस्ता खुला झाला आहे.

आराखडा तयार झाल्यावर पुन्हा होणार मोजणी
समांतर पूल रेल्वे विभागाकडून बांधण्यात येणार आहे. या आराखड्यासाठी महापालिकेने रेल्वे विभागाकडे 18 लाखांची रक्कम भरली आहे. आराखडा तयार केल्यानंतर या या रस्त्याची पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.

Back to top button