नाशिक : चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप | पुढारी

नाशिक : चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरात कोणी नसताना चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मागील वर्षी पंचवटी परिसरात ही घटना घडली होती. पित्याविरोधात बलात्कार, पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. ९ एप्रिल २०२१ रोजी फुलेनगर परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय पित्याने आपल्याच अल्पवयीन मुलीला धमकावत अत्याचार केला होता. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलिसांनी पीडितेच्या पित्याविरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी करीत आरोपीविरोधातील पुरावे गोळा करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ॲड. रेवती कोतवाल यांनी युक्तिवाद केला.

या आरोपीविरोधात पुरावे, साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार गुन्हा शाबित झाला. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी आरोपी पित्याला जन्मठेप व २५ हजारांची दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एम. एम. पिंगळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. डी. कडवे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

Back to top button