

पाटस : पुढारी वृत्तसेवा: पाटस (ता. दौंड) येथील दुपारचा विसावा घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी रोटी घाट पार करून पुढे उंडवडी गवळ्याचीकडे जातो. रोटी घाटातून पालखी सोहळा पुढे नेण्यासाठी पूर्वी अवघड नागमोडी वळणे पार करावी लागत होती. पण, या पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणात रोटी घाट आणि वळणे काढून टाकण्यात आली. मात्र, चढ नाहीसा करण्यात आला नसल्याने या वेळी जास्त बैलजोड्यांची मदत घेऊन रोटी घाट पार करावा लागणार आहे.
यंदा वारकर्यांची संख्या जास्त असणार आहे. पालखी महामार्गाचे काम रोटी घाटात बर्यापैकी पूर्ण झाले असल्याने वारकर्यांसाठी हा प्रवास सोईचा झाला आहे. अद्यापही पाऊस पडला नसल्याने डोंगरातील या घाटात गवताचे अंकुर फुटलेले दिसत नाहीत. सोलापूर महामार्गावरील बारामती फाटा ते रोटी घाटादरम्यानचा टप्पा पार करताना वारकर्यांना कसलीच अडचण येत नव्हती.
पण रस्त्याचे काम चालू असल्याने जुना ते नवीन रस्ता या संगमावर यंदा एक नव्याने चढ निर्माण झाला असल्याने या ठिकाणी अडचण निर्माण होईल का, अशी शंका येत आहे. पुढच्या वर्षी नव्याने तयार होणार्या पालखी महामार्गाच्या कामात नव्याने बारामती फाटा निर्माण होणार असल्याने पालखी सोहळा या रस्त्याने जाणार आहे.
घाटातील सौंदर्य कायम
ऐतिहासिक महत्त्व असलेला रोटी घाट चौपदरीकरणात नष्ट झाला असला तरी या महामार्गावर पालखी नव्याने तयार झालेल्या रोटी घाटातून पाटस परिसर, वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव, भीमा पाटस कारखाना, मोटेवाडा मंदिर व परिसर, पाटसगाव तलाव, मस्तानी तलाव परिसर तसेच नैसर्गिक दृश्य पाहता येणार आहे.
हेही वाचा