गोवा : कुडचडेत काँग्रेसने गमावली संधी; काब्राल यांच्यासमोर विरोधकांनी दुसर्‍यांदा टेकले हात | पुढारी

गोवा : कुडचडेत काँग्रेसने गमावली संधी; काब्राल यांच्यासमोर विरोधकांनी दुसर्‍यांदा टेकले हात

मडगाव; विशाल नाईक : कुडचडे-काकोडा नगराध्यक्षपदासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी सुचविलेल्या डॉ. जास्मिन ब्रागांजा यांच्या नावाला विरोधी गटासह सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीही विरोध केला होता. त्यामुळे कुडचडे-काकोडा नगरपालिकेत सत्ता स्थापनेची सुवर्णसंधी विरोधी गटाला प्राप्त झाली होती; परंतु या संधीचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर कुडचडेत काँग्रेसला सलग दुसर्‍यांदा नमते घ्यावे लागले आहे.

मंत्री काब्राल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा बनली होती. विधानसभा निवडणुकीत कुडचडेतून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार अमित पाटकर हे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. दिल्लीत जाऊन भाजपविरोधी निदर्शने करणार्‍या पाटकर यांच्याकडे कुडचडेत पालिकेवर काँग्रेसची सत्ता आणण्याची सुवर्णसंधी चालून आली होती, मात्र नगराध्यक्षपद मिळविणे लांबच राहिले, एक उमेदवारी अर्जही काँग्रेस समर्थक नगरसेवकांना जास्मिन यांच्या विरोधात दाखल करता आला नाही. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा काब्राल यांच्यासमोर हात टेकल्याचे सिद्ध झाले आहे. कुडचडे-काकोडा नगरपालिका काब्राल यांच्यासाठी महत्त्वाची आहे. काब्राल यांनी कधीच ही पालिका आपल्या ताब्यातून सोडलेली नाही. आपल्या गटातील नगरसेवकाला नगराध्यक्षपदावर बसवून त्यांनी आपली सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेली दहा वर्षे हीच स्थिती आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच काब्राल यांचा गट फुटला होता. त्यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे बाळकृष्ण होडरकर यांनी त्यांची साथ सोडून काँग्रेसचे उमेदवार अमित पाटकर यांची साथ धरली होती. त्यांच्याबरोबर काब्राल गटातील नगरसेवक सुशांत नाईक हेही बाहेर पडले होते. विरोधक म्हणून त्यांना अपर्णा प्रभुदेसाई, मंगलदास घाडी, क्लेमेंटिना फर्नांडिस आणि काही छुप्या नगरसेवकांचाही साथ मिळाली होती. आता त्यातील अनेकजण स्वतःला काब्राल समर्थक म्हणवून घेत आहेत. त्यांच्या बळावर होडरकर नगराध्यक्ष झाले, पण ते औटघटकेसाठी. काब्राल यांनी राजकीय खेळी खेळत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आणि भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत देसाई नगराध्यक्ष झाले. त्यांना एका वर्षासाठी हे पद देण्यात आले होत. लिखित करारानुसार त्यांच्यानंतर काब्राल गटाच्या ब्रागांज यांना नगराध्यक्षपद देण्याचे ठरले होते. त्यानुसार खुद्द काब्राल यांनी तशी सूचना देऊन विश्वास यांना पायउतार होण्यास सांगितले होते. पण विश्वास आणि त्यांच्या इतर नगरसेवकांना ते मंजूर नव्हते. म्हणून सावंत यांनी पद सोडण्यासाठी बरेच दिवस घेतले. त्यांनी पद सोडल्यास जास्मिन यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केली जाईल, असा इशाराही काब्राल गटातील नगरसेवकांनी दिला होता. पण, काहीही झाले तरी पालिकेत काब्राल यांचाच शब्द चालतो, याची जाणीव कुडचडेवासीयांना होती.त्यामुळे नगरसेवकांचे हे बंड केवळ पेल्यातील वादळ ठरले. विश्वास गुपचूप पणजीत जाऊन आपला राजीनामा देऊन आले. मी मी म्हणणारे नगरसेवक अचानक कुठल्या कुठेच गायब झाले. जास्मिन यांना विरोध करणारा एकही नगरसेवक बुधवारी पुढे आला नाही. विशेष म्हणजे जास्मिन उमेदवारी दाखल करताना विश्वास सावंत त्यांच्यासोबत होते.

काब्राल यांच्या गटात गेलेले अनेक नगरसेवक काँग्रेसच्या समर्थनावर निवडून आले होते. नंतर त्यांनी काब्राल यांच्याशी हातमिळवणी केली होती. त्या नगरसेवकांचे काब्राल यांच्यासाठी असलेले योगदान गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते. त्यांना नंतर कशी वागणूक मिळाली, हे कुडचडेवासीयांनी पाहिले आहे. त्या नगरसेवकांच्या बळावर यंदा पालिकेवर काँग्रेसची सत्ता आली असती; पण काँग्रेसला ते शक्य झाले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर हे कुडचडेतील आहेत. पालिकेतील या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. विरोधी गटाकडून नगराध्यक्षपदासाठी अर्जही दाखल करता आला नाही. यावरून विरोधीगटाने काब्राल यांच्यासमोर नमते घेतल्याचे पुन्हा स्पष्ट झालेआहे.

विरोधक वाढले, स्थिती ‘जैसे थे’च

पूर्वी बोटांवर मोजण्या एवढे नगरसेवक विरोधी गटाकडे होते. त्यावेळी पक्ष पातळीवर पालिका निवडणुका होत नसल्या तरी विरोधी गटातील नगरसेवक म्हणजेच काँग्रेस समर्थक नगरसेवक असे मानले जायचे. पण आता स्थिती बदलली आहे. काब्राल यांना विरोध करण्यासाठी सक्षम विरोधक नगरसेवकांचे बळ आहे. सर्वजण एकाच पक्षाचे नसले तरीही सर्वांचे धोरण भाजपविरोधी म्हणजेच काब्रालविरोधी आहे. तरीही काब्राल यांना पालिकेवर सत्ता आणण्यापासून रोखले जात नाही, ही बाब चकित करणारी आहे.

Back to top button