नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनई येथे पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे भूमिपूजन | पुढारी

नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनई येथे पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे भूमिपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंधश्रद्धा, विषमता आणि पारतंत्र्यात असलेल्या देशात समाजाचा विरोध पत्करून महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. फुले दाम्पत्याच्या दिलेल्या शिकवणीच्या मार्गावरून जाताना पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहात असल्याचा सार्थ अभिमान आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अशी उपकेंद्रे उभारताना बदलत्या तंत्रज्ञानाचा शिक्षणात अंतर्भाव करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवनई (ता. दिंडोरी) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि.17) पार पडला. यावेळी दूरद़ृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्रति-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, वियज सोनवणे आदी उपस्थित होते.

भारतात गुरू आणि शिष्याचे महत्त्व अधिक आहे. पूर्वीपासून गुरुकुल आणि आजच्या काळातील वसतिगृह ही पद्धती संलग्नित आहे. त्याचेच पुढील पाऊल म्हणून प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ उपकेंद्र उभारण्याचा मानस असून, त्याद्वारे फुले दाम्पत्याचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. कारभारी काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.पुणे विद्यापीठ उपकेंद्राला शहराशी कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून रस्ता तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. छगन भुजबळ यांनी दिले. उपकेंद्र परिसरात स्किल डेव्हलपमेंट संकुलासाठी जिल्हा नियोजनमधून 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही केली.

भुजबळांकडून विद्यार्थ्यांना चिमटे
कोरोनातून बाहेर पडत असतानादेखील विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेची मागणी करत असल्याची खंत ना. सामंत यांनी व्यक्त केली. सामंत यांचा हाच धागा पकडून ना. भुजबळ यांनी, मी दोन वर्षे आत होतो, तेव्हाही मी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. मग तुम्हाला ड्रिप्रेशनमध्ये जाण्याचे कारण काय, असे सांगत परीक्षेच्या तयारीला लागण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

परीक्षा ऑफलाइनच
कोरोनावर मात केल्यानंतर आता ऑनलाइन परीक्षेवर मात करून ऑफलाइन परीक्षेसाठी सज्ज व्हा, असे ना. उदय सामंत यांनी आवाहन विद्यार्थ्यांना केले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन केंद्रासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तीन कोटींचा निधी दिला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी 3 कोटींचा निधी देण्याची घोषणा सामंत यांनी केली.

आरोग्य, शिक्षणाचे महत्त्व मोठे : पवार
आजच्या काळात आरोग्य आणि शिक्षणाचे महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन डॉ. भारती पवार यांनी केले. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भविष्याचा भारत दिसत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेल्या प्रणालीच्या सहाय्याने देशातील जनतेला कोरोनाच्या 195 लशींचे डोस दिल्याचे सांगत त्यांनी शिक्षण ही यशाचे प्रवेशद्वार असल्याचे त्या म्हणाल्या.

विद्यापीठाच्या नियोजनातील असाही गोंधळ
उपकेंद्र भूमिपूजन सोहळ्यात पुणे विद्यापीठाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत असताना मध्येच सर्व्हर बंद पडल्याने 5 मिनिटे कार्यक्रम थांबला होता. मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर राष्ट्रगीत व विद्यापीठ गान घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित वक्त्यांची मनोगते पार पडली. पण या सर्व गोंधळात मान्यवरांचा सत्कार, उपस्थितांच्या परिचयावेळी निवेदकांकडून चुका घडल्या.

हेही वाचा :

Back to top button