दहावीत सोलापूर जिल्हा पुणे विभागात अव्वल | पुढारी

दहावीत सोलापूर जिल्हा पुणे विभागात अव्वल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्हा पुणे विभागात अव्वल ठरला आहे. सोलापूरचा निकाल 97.74 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणार्‍या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे.
शुक्रवारी दुपारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यात पुणे विभागात पुणे जिल्ह्याचा निकाल 96. 77 टक्के, अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 96.58 टक्के इतका लागला.निकालानंतर यश संपादन केलेल्या मुलांसह पालकांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 65 हजार 253 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 64 हजार 652 विद्यार्थी परीक्षा दिले होते. त्यापैकी 63 हजार 196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 35 हजार 102 मुली, तर 28 हजार 94 मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात 30 हजार 787 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 23 हजार 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 8 हजार 169 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून 2032 विद्यार्थी पुनर्परीक्षा म्हणून नोंदणी केली होती. यात 1999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 1592 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 79.63% निकाल लागला आहे.

अकरावी प्रवेशात 11 हजार जागा शिल्लक राहणार

जिल्ह्यामध्ये विविध कॉलेजमध्ये अकरासाठी एकूण 74 हजार 580 इतकी प्रवेश क्षमता आहे. यात विज्ञान शाखेसाठी 32 हजार, वाणिज्य शाखेसाठी 23 हजार 500, कला शाखेसाठी 17 हजार तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 2 हजार, टेक्निकल शाखेसाठी 80 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार असून त्यानंतरही 11 हजार 387 जागा प्रवेशाविना शिल्लक राहणार आहेत.

राज्यातील निम्म्या शाळा शंभर नंबरी!

राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के; कोकण विभाग अव्वल,

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील 22 हजार 921 शाळांपैकी 12 हजार 210 शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 122 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. 83 हजारांवर विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. बारावीप्रमाणेच या परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. राज्याचा निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर यंदा पारंपरिक पद्धतीने झालेल्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला.

सचिव डॉ. अशोक भोसले यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. यंदा शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या थोडी घटली असली तरी, गेल्या वर्षीच्या निकालाचा अपवाद वगळता यंदाचा मंडळाच्या इतिहासातील आतापर्यंतचा विक्रमी निकाल आहे.

मुलींची बाजी

यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 1.90 टक्क्याने अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक; तर त्या खालोखाल कोल्हापूर, लातूर, नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती विभागाने बाजी मारली आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.

Back to top button