नाशिक : शेतमालास भेट देत मार्केटिंगची संकल्पना | पुढारी

नाशिक : शेतमालास भेट देत मार्केटिंगची संकल्पना

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
जनतेने यापुढे केक कापत किंवा महागड्या वस्तू भेट देण्याऐवजी कांदा, फळांची टोपली व भाजीपाला भेट देण्याचा विचार करावा. शेतकर्‍यांच्या शेतमालाचे योग्य मार्केटिंग करत दोन पैसे त्यांच्या घरात जातील, अशी संकल्पना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मांडली आहे.

युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर कापडणीस यांना वाढदिवसानिमित्त संघटनेतील पदाधिकार्‍यांनी कांदे भेट देत लोकप्रतिनिधींचे शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला. सध्या नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कांदा भावाच्या प्रश्नावर मोठे वादंग उठले आहे. कांदा उत्पादकांना कवडीमोल किमतीत कांदा विक्री करावा लागत आहे. सर्वच शेतकरी संघटना कांद्याला योग्य भाव व अनुदान देण्याची मागणी करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या प्रश्नांकडे डोळेझाक करत असून, एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख अभिमन पगार व सहकारी शेतकर्‍यांनी कापडणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतमाल भेट संकल्पना राबवली. याप्रसंगी बागलाण तालुका उपाध्यक्ष दिगंबर धोंडगे, युवक तालुकाध्यक्ष हर्षल अहिरे, खामलोणचे उपसरपंच सुनील सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button