स्वच्छ शहर सर्वेक्षण : केंद्राच्या पथकाने नाशिक शहरात ‘या’ भागांची केली पाहणी

स्वच्छ शहर सर्वेक्षण : केंद्राच्या पथकाने नाशिक शहरात ‘या’ भागांची केली पाहणी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक' अशी बिरुदावली लाभलेल्या नाशिक शहरात स्वच्छतेची काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये चार दिवसांसाठी दाखल झाले आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी शहराच्या विविध भागांत पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. हे पथक सोमवारी (दि. 6) नाशिकमध्ये दाखल झाले असून, पुढील चार दिवस शहराच्या विविध भागांमध्ये पाहणी करणार आहेत.

स्वच्छ शहर स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणासाठी हे पथक पुढील चार दिवस घरगुती, व्यावसायिक कचर्‍याची विल्हेवाट, घंटागाडीचे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी होणारी स्वच्छता आदींबाबत पाहणी करणार आहे. दरम्यान, नाशिकला देशातील पहिल्या 10 शहरांत आणण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी कंबर कसली आहे.

केंद्र सरकारने 2019 मध्ये 10 लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील 500 शहरांची निवड स्वच्छ शहर स्पर्धेसाठी केली होती. त्यामध्ये नाशिक 67 व्या क्रमांकावर होते. 'स्वच्छ व सुंदर नाशिक' अशी ओळख असूनही नाशिक पहिल्या 10 शहरांमध्ये येऊ शकले नव्हते. मात्र, वर्षभरातच नाशिकने स्वच्छतेमध्ये आघाडी घेत 2020 मध्ये 11 वे स्थान मिळविले होते. त्यामुळे 2021 मध्ये नाशिकला पहिल्या 10मध्ये स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, नाशिकची 17 व्या स्थानी घसरण झाल्याने, पुन्हा एकदा पदरी निराशा पडली. या घसरणीला बांधकाम साहित्याचा मलबा कारणीभूत असल्याचे त्यावेळी निर्दशनास आले होते. दरम्यान, यावेळी नाशिकला पहिल्या 10 शहरांमध्ये आणण्यासाठी मनपा आयुक्त पवार यांनी कंबर कसली असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे. या स्पर्धेत सिटिझन फीडबॅक महत्त्वपूर्ण असल्याने तब्बल एक लाख नाशिककरांनी केंद्राच्या संकेतस्थळावर आपला फीडबॅक नोंदविणे अपेक्षित असल्याने, आयुक्त पवार यांनी गेल्या एप्रिल महिन्यात याबाबत जनजागृतीही केली होती. त्याकरिता त्यांनी विविध राजकीय पक्ष, निमा-आयमा, क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन, व्यापारी संघटना तसेच शहरातील शाळा-महाविद्यालये यांना सहभागी करून घेतले होते. त्यामुळे जवळपास 40 हजार नागरिकांनी या ठिकाणी फीडबॅक नोंदविला आहे.

दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणासाठी केंद्रांच्या पथकात पाच अधिकारी व कर्मचारी असून, मंगळवारी (दि.7) सकाळपासूनच शहराच्या विविध भागांत जाऊन त्यांच्याकडून स्वच्छतेची पाहणी केली जात आहे. दरम्यान, 700 सफाई कर्मचार्‍यांसह महापालिकेच्या नियमित दीड हजार कर्मचार्‍यांकडून शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात आहेत.

या भागांची पाहणी
केंद्राच्या पथकाकडून बसडेपो, रेल्वेस्थानक, रामकुंड, रेल्वेस्थानक, गोदावरी किनार्‍यावरील गर्दीचा भाग, प्रमुख धार्मिकस्थळे या भागातील स्वच्छतेबाबतची पाहणी केली आहे. रहिवासी, वाणिज्य तसेच व्यावसायिक इमारतीमधील कचर्‍याची विल्हेवाट, स्वच्छता व एकूणच व्यवस्थापनाची पाहणी या पथकाकडून केली जात आहे. दरम्यान, काही महिन्यांनंतर तिसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षण होणार असून, त्यात घरगुती, व्यावसायिक व वाणिज्य वापराच्या इमारतीतील सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली जाणार आहे.

शहर स्वच्छ स्पर्धेच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या स्पर्धेत नाशिकला पहिल्या 10 शहरांमध्ये स्थान मिळावे याकरिता मनपा कसोशीने प्रयत्न करीत आहे. सफाई कर्मचार्‍यांमार्फत शहराची सफाई केली जात आहे. यात कुठे त्रुटी राहत असल्यास नागरिकांनी कळवावे व सहकार्य करावे.
– डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news