नाशिक : कोविड सेंटरसाठी तयारी झाली सुरू; प्रशासन सतर्क | पुढारी

नाशिक : कोविड सेंटरसाठी तयारी झाली सुरू; प्रशासन सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ग्रामीण भागात आरोग्य विभागाने कोविड सेंटरमधील आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिल्या आहेत. तर मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शहरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सक्रिय बाधित संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. बाधितांमध्ये गंभीर लक्षणे दिसत नसली तरी संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरणासह संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांचा शोध घेण्यासाठी मनपा प्रशासन ‘हर घर दस्तक’ मोहिमेंंतर्गत सहा विभागांत सहा ते सात पथकांची स्थापना करणार आहे. लसीकरण न झालेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवणार आहे. यासोबत ज्या ठिकाणी लसीकरण न झालेल्यांची संख्या अधिक असेल, त्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश पवार यांनी वैद्यकीय विभागास दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटर पुन्हा कार्यान्वित झाले असून, तेथे एका बाधितावर उपचार सुरू आहे. तर ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढल्यास तेथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठीची तयारी पूर्ण करण्याचे आदेश
डॉ. थोरात यांनी दिले आहेत.

दिवसभरात आठ बाधित
जिल्ह्यात सोमवारी (दि. 6) नव्याने आठ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात शहरात सात व मालेगावमध्ये एक बाधित आढळला आहे. त्याचप्रमाणे दोघे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 36 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू असून, त्यापैकी नऊ जणांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील 266 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे.

23 टक्के नागरिक दुसर्‍या डोसपासून वंचित
शहरात 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 13 लाख 63 हजार 700 लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 96 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस न घेणार्‍यांची संख्या ही 77 टक्के आहे. त्यामुळे 23 टक्के नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. तर 15 ते 18 वयोगटांतील 90 हजार 300 युवकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 69 टक्के युवकांनी पहिला, तर 44 टक्के युवकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. 12 ते 14 वयोगटांतील किशोरवयीन गटातील 58 हजार 450 मुलांपैकी 72 टक्के मुलांनी पहिला, तर 34 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे.

हेही वाचा:

Back to top button