नाशिक : रात्रभर गस्त; तरी दिवसा खून : गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ | पुढारी

नाशिक : रात्रभर गस्त; तरी दिवसा खून : गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाते. त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही दिवसा खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारीसारखे प्रकार घडत असल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 3) रात्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही ठिकाणी पायी गस्त घातली होती. मात्र, दुसर्‍या दिवशीच शनिवारी (दि. 4) दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलांनी एकावर शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. शहरात एकापाठोपाठ एक असे सात खून झाल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा रंगली आहे. अनेक अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत, तर काही अधिकारी व अंमलदार कामाच्या मोबदल्यात पैशांची मागणी करण्यात व्यग्र असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुन्हेगारांनी याचा फायदा घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. चोरी, घरफोडी, जबरी चोरीसह खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी कोम्बिंग, मिशन ऑल आउट मोहिमा पुन्हा राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर दिसत नसल्याचे बोलले जात आहे. रात्रभर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड, शोधमोहीम राबविली जात असून, अवैध मद्यविक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू असून, टवाळखोरांवरही कारवाई केली जात असल्याचा दावा पोलिसांकडून होत आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणीही केली जात आहे. मात्र, तरीदेखील गुन्हे कमी होत नसल्याचे तो चर्चेचा विषय झाला आहे. पंचवटीत दुचाकीवर आलेल्या अल्पवयीन मुलांनी शस्त्र लपविले होते. किरकोळ कारणातून त्यांनी एकावर शस्त्राचे वार करून पळ काढला.
याप्रकारे शहरात हाणामारी होत असून, त्यातील अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत येत नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबतच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांवर अंकुश ठेवण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा:

Back to top button