Jalgaon : फाली संमेलनात 68 मॉडेल्सचे सादरीकरण | पुढारी

Jalgaon : फाली संमेलनात 68 मॉडेल्सचे सादरीकरण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली अर्थात फ्युचर अ‍ॅग्रिकल्चर लिडर्स ऑफ इंडियाच्या दुसर्‍या दिवसाच्या दुसर्‍या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांनी कृषी व्यवसाय मॉडेल्सचे सादरीकरण केले. आकाश मैदानावरील डोम मध्ये 68 नावीन्यपूर्ण उपकरणे सादर करण्यात आली. यावेळी परीक्षक व सादरीकरण करणार्‍या फाली विद्यार्थी यांच्यात प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला गेला.

परिश्रम, बडीहांडा हॉल आणि गांधीतीर्थ सभागृहात 68 कृषी व्यवसाय मॉडेल्सचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. एक कृषी व्यवसाय मॉडेल सादर करण्यासाठी तीन ते चार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यात परीक्षक म्हणून बुर्जीस गोदरेज (संचालक, गोदरेज अ‍ॅग्रोवेट), अथांग जैन (संचालक, जैन फार्म फ्रेश फूडस् लि.), सरबजितसिंग (स्टार अ‍ॅग्री), तुषार त्रिवेदी (यूपीएल), किशोर रवाळे (जैन फार्म फ्रेश फूडस् लि.), शिवराम यदवल्ली (गोदरेज अ‍ॅग्रोवेट), जयप्रकाश लिखिते (समुन्नती), अजिंक तांदळे (यूपीएल), डॉ. बी. के. यादव (जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.), अभय यावलकर (रॅलिज इंडिया), सूरज पानपत्ते (स्टार अ‍ॅग्री), डॉ. अनिल ढाके (जैन इरिगेशन), श्रीमती जिज्ञासा (रॅलीज) यांचा समावेश होता.

अनिल जैन यांची भेट
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अ‍ॅग्रोवेटचे संचालक बुर्जीस गोदरेज, जैन फार्म फ्रेश फूडस् लि. संचालक अथांग जैन, स्टार अ‍ॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, फालीचे आयोजन करणार्‍या नॅन्सी बेरी यांनी विद्यार्थ्यांच्या इन्होव्हेशन्सला भेट दिली. त्यांनी मांडलेल्या उपकरणाची वैशिष्ट्ये, त्याची उपयोग करण्याची पद्धती, त्याच्या निर्मिती खर्च याबाबत जाणून घेतले.

नवउद्योजकांना सहकार्य
फाली उपक्रमातून नवउद्योजक घडविण्यासाठी सहकार्य केले जाईल. विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची व्यवस्था, स्कॉलरशीप देण्यात येईल. फालीव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी हे ज्ञान खुले व्हावे यासाठी पोर्टलदेखील सुरू करण्याची योजना असल्याची माहिती जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनिल जोशी व रोहिणी घाडगे उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button