नाशिक : व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये ऍड केले म्हणून युवकावर हल्ला | पुढारी

नाशिक : व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये ऍड केले म्हणून युवकावर हल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये ऍड केले म्हणून झालेल्या वादात पंचवटीतील विजयनगर कॉलनीत एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली असून, यात दीपक डावरे (२१ रा. संत जनार्दन स्वामी नगर, आडगाव नाका) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान आहेर याने शुक्रवारी (दि.३) मित्रांचा व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये संशयित हल्लेखोर असलेल्या दोघा मित्रांना ऍड केले. मात्र ‘तू आम्हाला ग्रुपमध्ये का ऍड केले, आम्हाला ग्रुपमधून काढून टाक’, असे म्हणत दोघा संशयितांनी समाधान आहेर यास शिवीगाळ केली होती. हा प्रकार समाधानने दीपक डावरेसह अन्य मित्रांना सांगितला. यावर शनिवारी (दि. ४) दीपक व अन्य मित्र क्रिकेट खेळत असताना दीपकने त्या दोघांना फोन करून विजय नगर कॉलनीतील मैदानावर बोलावून घेतले. दीपकने वाद मिटवण्याची भूमिका घेतली मात्र यादरम्यान संशयितांमध्ये बाचाबाची झाली. त्यावर दीपकने संशयितावर बॅट उगारली. त्याला प्रतित्युत्तर म्हणून दोघांपैकी एका संशयिताने दुचाकीच्या मॅटखाली ठेवलेला कोयता काढून दीपकवर वार केले. यात दिपक गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकला पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. यावेळी हल्लेखोरांनी कोयता खाली टाकून व दुचाकी सोडून पलायन केले. त्यावर घटनास्थळावरील काही मित्रांनी जखमी दीपकला उपचारार्थ प्रथम शासकीय रुग्णालयात नेले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यास खासगी रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयिताना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button