नाशिक : भारतातून प्रथमच केशर आंब्याची ‘समुद्र सफर’ | पुढारी

नाशिक : भारतातून प्रथमच केशर आंब्याची ‘समुद्र सफर’

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा
जगभरातील खवय्यांना भुरळ घालणार्‍या भारतीय केशर आंब्याची यंदा प्रथमच समुद्रामार्गे परदेशवारी झाली आहे. तीन किलो वजन असलेल्या 5 हजार 520 बॉक्समधून जवळपास 16 टन केशर आंब्यावर हॉट वॉटर आणि विकिरण प्रक्रिया करून मुंबईहून एक कंटेनर अमेरिकेकडे रवाना केला आहे.

भारतातून हवाईमार्गे आंबा निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो 550 रुपये खर्च येतो, तर समुद्रामार्गे निर्यात केल्यास 100 रुपये प्रतिकिलो खर्च येतो. हवाईमार्गे आणि समुद्रामार्गे वाहतूक खर्चाचा विचार केल्यास प्रतिकिलो 450 रुपये बचत होत होते. आंबा हे नाशवंत फळ असल्याने त्याची समुद्रामार्गे निर्यात अतिशय जिकिरीची असते. हवाईमार्गे होणारी निर्यात ही अतिशय खर्चिक आहे. मात्र, आता या आव्हानावर तोडगा काढण्यात आला आहे. कच्चा आंबा साधारण दोन आठवड्यांनंतर पिकतो. समुद्रामार्गे निर्यातीत हीच मोठी अडचण आहे. निर्यातीला तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंबा त्या त्या देशातील निकष पूर्ण करण्यात सक्षम ठरत नाही. भारतातून सर्वाधिक निर्यात ही द्राक्षाची होते. भारतात द्राक्षाखालोखाल आंब्याचे उत्पादन होत असले, तरी त्याची निर्यात शक्य होत नाही. हवाईमार्गे होणारी निर्यात अत्यंत महागडी आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून, निर्यातदार संस्था सानप अ‍ॅग्रोनिमल्स या संस्थेने बीएआरसी सोबत सामंजस्य करार करून अमेरिकेला आंबा निर्यात करण्याचे आव्हान उचलले आहे. बीएआरसीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कंटेनरद्वारे समुद्रामार्गे होणार्‍या निर्यातीवेळी आंबा सुरक्षित राहू शकतो, असे सांगण्यात आले आहे. भारतातून प्रथमच अशा प्रकारच्या निर्यातीला प्रारंभ झाला आहे. नवी मुंबईतील बीएआरसीच्या विकिरण केंद्राच्या ठिकाणाहून पहिल्या कंटेनरला शुक्रवारी सायंकाळी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. याप्रसंगी बीएआरसीचे संचालक डॉ. टी. के. घंटी, अमेरिकेच्या सुरक्षा अधिकारी डॉ. कॅथरिन फिल्डर, पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख, झेड. ए. अन्सारी, अपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्र, शिवाजी सानप, हेमंत सानप, जयंत सानप आदी उपस्थित होते.

आंबा निर्यातीला मोठा वाव –
आंबा उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र, निर्यातीचा विचार केल्यास आंब्याच्या एकूण उत्पादनापैकी एक टक्क्याहून कमी निर्यातही होत असते. त्यामुळे आंबा निर्यातीमध्ये प्रचंड वाव आहे. याबाबत भारत सरकारने समुद्रामार्गे फळे आणि शेतमाल निर्यातीस चालना दिल्यास देशाच्या परकीय चलनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button