नाशिक : धोकादायक पूल, इमारतींचे ऑडिट करा, आपत्ती प्राधिकरणाच्या सूचना | पुढारी

नाशिक : धोकादायक पूल, इमारतींचे ऑडिट करा, आपत्ती प्राधिकरणाच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांना तत्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी पूर्व नियोजन करण्यात यावे, महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारती, पडके वाडे, पूल यांचे तत्काळ ऑडिट करून संबंधितांना नोटिसा देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने नाशिक व मालेगाव महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

पावसाळ्यात धोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्यासाठी अथवा दुरुस्त करण्याचे आदेश देण्याची सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने केली आहे. अतिवृष्टीमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीस पूर येतो. त्यामुळे पंचवटी, रामकुंड या भागातील नदीच्या पाण्याची पातळी वाढते. यामुळे येथील पार्किंग झोनमध्ये पाणी शिरल्याने वाहने अडकतात तसेच वाहून जातात. यावर उपाययोजना म्हणून योग्य ठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावेत. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत वाहने काढण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करून या ठिकाणी स्वतंत्र पथके नियुक्त करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले आहेत.

पावसाळ्यात यंत्रणांनी मनुष्यबळ, मशीनरी, विद्युत बॅकअप, औषधसाठा, रुग्णवाहिका या प्रकारची साधन सामग्री तयार ठेवावी. त्याचप्रमाणे पुराच्या परिस्थितीत स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. संभाव्य पूरग्रस्त, शोध व बचाव कार्यात काम करत असलेल्या कर्मचार्‍यांसाठी तात्पुरता निवारा, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. प्रशासकीय यंत्रणांनी अतिमहत्त्वाचे क्रमांक असलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्याची सूचना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने महापालिका प्रशासनास केली आहे.

काझीगढीकडे लक्ष वेधले
शहरी भागात अतिवृष्टी झाल्यास काझीगढी येथे दरड कोसळण्याची अधिक शक्यता असते. अशा परिस्थितीत तेथील नागरिकांशी मान्सून पूर्वीच चर्चा करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे त्या नागरिकांना स्थलांतरित केलेल्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वतयारी व उपाययोजना करण्यात याव्यात, असे सांगत प्राधिकरणाने काझीगढीकडे नाशिक महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.

नासर्डीसाठी स्वतंत्र पथके नेमणार…

नासर्डी (नंदिनी) नदीवर स्वतंत्र झोन तयार करून तेथे स्वतंत्र पथके नेमण्यात यावीत. तसेच 2016 व 2019 या वर्षातील पुराचा इतिहास लक्षात घेता, महापालिका हद्दीतील धरणाखालच्या क्षेत्रात मदत कार्यासाठी झोन स्थापन करावेत. तसेच त्या ठिकाणी बचाव कार्यासाठी पथके नियुक्त करावीत. पावसाळ्यातील या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असेही जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने महापालिका प्रशासनास कळविले आहे.

पावसाळ्यापूर्वी पाणवेली काढा…

पुराच्या परिस्थितीत नदीतील पाणवेली पुलामध्ये अडकून पडतात. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. यासाठी गोदापात्रातील पाणवेली मान्सूनपूर्वीच काढून घेण्यात याव्यात. तसेच मान्सून स्थितीत मोठ्या प्रमाणावर वादळी वारे सुरू असतात, अशा परिस्थितीत रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांच्या लोखंडी फ—ेम्स, झाडे, घरांचे पत्रे उडतात. तसेच रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहने दबली जातात, अशा प्रसंगी मदत करण्यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती करून उपाययोजना कराव्यात. देवदूत रेस्क्यू वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून ते वाहन मान्सून काळात जिल्हा नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button