दहशतवाद ठेचायला हवा!

दहशतवाद ठेचायला हवा!
Published on
Updated on

संस्थापक – संपादक कै. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव,
मुख्य संपादक – डॉ. प्रतापसिंह ग. जाधव (पद्मश्री पुरस्काराने सन्मानित)

काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद संपुष्टात आणण्यासंदर्भात वारंवार सांगण्यात आले; परंतु दहशतवाद थांबत नाही. सख्खा शेजारी पक्का वैरी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतता नको आहे. त्यामुळे काश्मीर खोर्‍यात सतत अस्वस्थता राहील, यासाठी सीमेपलीकडून प्रयत्न केले जातात. त्याला भारत सरकारकडून सडेतोड उत्तर दिले जाते; परंतु तेवढ्या काळापुरती काही दिवस शांतता निर्माण होते आणि पुन्हा मागील पानावरून पुढे सुरू राहते. दहशतवाद्यांची आणि दहशतवाद्यांना रसद पुरवणार्‍यांची नांगी कधीतरी नीटपणे ठेचण्याची आवश्यकता आहे. परंतु, त्याआधी देशांतर्गत परिस्थितीही सुधारण्याची आवश्यकता आहे. काही प्रश्न हे राजकारणाच्या पलीकडचे असतात. राजकीय फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा विचार करावा लागतो आणि काश्मीरचा प्रश्न हा त्यापैकीच एक आहे. सरकारे आली आणि गेली तरी काश्मीरमधील परिस्थिती सुधारू शकली नाही.

ती सुधारत असल्याचा कधीतरी भास झाला; परंतु तेवढ्याच वेगाने पुन्हा बिघडल्याचे पाहायला मिळाले. अलीकडच्या काळातील घटनांबद्दल बोलायचे, तर नोटाबंदी झाली तेव्हा दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्यामुळे काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत होता. दुर्दैवाने तसे काही घडू शकले नाही. आता तर पाचशेच्या बनावट नोटांची चलनामध्ये शंभर टक्के वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पुढे 370 कलम हटवण्याचा मास्टरस्ट्रोक झाल्यानंतरही दहशतवाद संपल्याचा आणि जम्मू-काश्मीरमधील जनजीवन सुरळीत झाल्याचा दावा करण्यात येत होता. 370 वे कलम हटवल्यानंतरच्या काळात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला; परंतु दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले असून गेल्या वर्षभरात परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे.

अर्थात, ही होती काश्मीरमधील दहशतवादाची सामान्य स्थिती. ज्यामध्ये ठरावीक काळानंतर चढ-उतार होत राहिले. गेल्या महिनाभरात जी परिस्थिती समोर येत आहे, ती आहे काश्मीरमधील हिंदू पंडितांच्या हत्यांसंदर्भातील. काही आठवड्यांपूर्वी 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याद्वारे काश्मीर खोर्‍यातील हिंदू पंडितांवर नव्वदच्या दशकात झालेल्या कथित अत्याचाराची कहाणी दाखवण्यात आली होती. या चित्रपटात दाखवण्यात आलेले चित्रण एकतर्फी असल्याचे आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याची टीकाही झाली होती; परंतु या चित्रपटाने देशभरातील हिंदुत्ववाद्यांमध्ये एक प्रकारचा ज्वर निर्माण झाला. ज्या काश्मिरी पंडितांनी पलायन केले, तेसुद्धा सांगत होते की, आम्हाला काश्मीरमधील मुस्लिमांनी त्रास दिला नाही, उलट त्यांनी आम्हाला आधारच दिला.

परंतु, धार्मिक उन्मादाच्या लाटेवर स्वार झालेल्या लोकांना त्याच्याशी देणे-घेणे नव्हते. हिंदूंवर अत्याचार झाले आणि अत्याचार करणारे वेगळ्या धर्माचे होते हेच पालुपद त्यांनी लावून धरले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जे बिंबवायचे होते, ते नीट खालपर्यंत झिरपले होते. त्यातून धार्मिक विभाजनाची एक भिंत उभी राहून विद्वेषाचे वारे वाहू लागले होते. काश्मीर खोर्‍यात गेल्या महिनाभरात ज्या हत्या व्हायला लागल्या आहेत, त्यामागे 'काश्मीर फाईल्स' चित्रपटाने निर्माण केलेला विद्वेष आणि उन्माद कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काश्मीर प्रश्नाच्या केंद्रस्थानी दहशतवाद आहे. या दहशतवादाला पाकिस्तानकडून खतपाणी घातले जाते.

परंतु, ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना मात्र हे मान्य असल्याचे दिसत नाही. त्यांच्या द़ृष्टीने हा प्रश्न हिंदू-मुस्लिम संघर्षाचा आहे. त्यांच्या या मांडणीला पूरक असे चित्रण राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्याही करीत राहिल्यामुळे विद्वेष अधिक वाढत गेला. आता काश्मिरी पंडितांच्या टिपून हत्या होत आहेत, त्यामागे याच उन्मादाची चिथावणी आहे. ज्या काश्मीर खोर्‍यात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत होते आणि आजही राहताहेत, तिथल्या लोकांच्या मनात विद्वेष पेरण्याचे काम आपण करतोय, याचे भान यापैकी कुणालाच नव्हते. गेल्या महिनाभरातील घटनांमुळे अनेक काश्मिरी पंडित खोर्‍यातून पलायन करीत आहेत. त्यांच्या मनातही स्थानिक मुस्लिमांबद्दल तीळभरही कटुता नसल्याचे त्यांच्या मुलाखतींमधून दिसून येते. किंबहुना दहशतवादाची समस्या गंभीर असून तिचा धर्माशी संबंध नसल्याचेच स्थानिकांचे म्हणणे आहे.

हे केवळ आजचेच नव्हे, तर पूर्वापारचे वास्तव आहे. मधल्या काळात काश्मीरमधील हत्यांची जी आकडेवारी समोर आली होती, त्यानुसार 1990 ते 2007 या काळात काश्मीर खोर्‍यात 399 काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या होत्या. त्याच काळात 15 हजार मुस्लिमांच्या हत्या झाल्या होत्या. अलीकडेच संसदेत गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये 2019 पासून चार काश्मिरी पंडितांसह 14 हिंदूंच्या हत्या झाल्या. 370 कलम रद्द केल्यानंतर पंडितांनी काश्मीर खोर्‍यात परत येण्यासाठी पंतप्रधान पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 2,105 लोक खोर्‍यात परत आल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

21 मे रोजी हत्या झालेले राहुल भट यांनाही पंतप्रधान पुनर्वसन योजनेअंतर्गत नोकरी मिळालेली होती. त्यानंतर सातत्याने होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्यांचा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. ते स्वाभाविकही आहे; परंतु त्याचवेळी दहशतवाद्यांकडून स्थलांतरित मजूर, जम्मू-काश्मीर पोलिसांसह काश्मिरी मुस्लिमांच्याही हत्या होत आहेत. मरणारी सगळी माणसे असताना ठरावीक घटनांच्याच मोठ्या बातम्या बनवल्या जात असल्याबद्दलची नाराजी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मनात हे विष पेरण्याचे काम अर्थातच प्रसारमाध्यमांमधील घटकांबरोबरच सिनेमाच्या नावावर धंदेवाईकपणा करणार्‍यांनी केले आहे.

राजकारणासाठी त्याचा वापर करणार्‍यांनी त्याला खतपाणी घातले. हे राजकारणच सगळ्यांना मातीत घालण्याचे काम करीत आहे. त्यापलीकडे जाऊन काश्मीर खोर्‍यातील स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करण्याची, त्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या सहकार्याच्या बळावरच सीमेपलीकडून पोसल्या जाणार्‍या दहशतवादाची नांगी ठेचता येईल. त्यासाठी आधी 'हिंदू-मुस्लिम'ंच्या पलीकडे जाऊन काश्मीर प्रश्नाचा विचार करावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news