धुळे : अवैध सावकारी करणाऱ्या विमा एजंटकडे सापडले कोट्यवधींचे घबाड | पुढारी

धुळे : अवैध सावकारी करणाऱ्या विमा एजंटकडे सापडले कोट्यवधींचे घबाड

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अवैध सावकारीच्या माध्यमातून शेकडो लोकांना देशोधडीला लावणार्‍या विमा एजंट राजेंद्र बंब याच्या एकाच बँकेच्या लॉकर मधून तब्बल 2 कोटी 54 लाख 88 हजाराची रोकड आणि 19 लाख पाच हजार रुपयाचे दागिने असा दोन कोटी 73 लाख 93 हजाराचा मुद्देमाल सापडला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.२) सदरचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत आणखी दोन बँकांच्या लॉकरला सील करण्यात आले आहेत. या लॉकरमध्ये देखील मोठे घबाड सापडणार असल्याचा संशय आहे.

धुळ्याचे विमा एजंट राजेंद्र बंब यांच्या विरोधात अवैध सावकारी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर दोन ठिकाणावर पोलिसांनी छापेमारी करून बुधवारी कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले. या दरम्यान गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, तसेच कर्मचारी नितीन चव्हाण, रवींद्र शिंपी, शाकीर शेख, राजेंद्र गीते आदींनी उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या समवेत जळगाव जनता सहकारी बँकेत असलेल्या लॉकर वर कारवाई केली. आर्थिक गुन्हे शाखेने बंब यांच्याकडे लॉकरची चावी मागितली. पण बंब यांनी या लॉकरची चावी दिली नाही. त्यामुळे पथकाने बँकेच्या सहकार्याने गुरुवारी लॉकर उघडले. लॉकरमध्ये तब्बल दोन कोटी 54 लाख 88 हजारची रोकड आढळून आली. तर 19 लाख पाच हजार रुपयांचे दागिने देखील आढळून आले. बंब यांच्या आणखी दोन लॉकरची माहिती मिळाली असून शिरपूर पीपल्स बँक आणि योगेश्वर पतसंस्थेत देखील अशाच प्रकारे करोडो रुपयाचे धबाड मिळणार असल्याचा तपास पथकाला संशय आहे.

बुधवारी झालेल्या कारवाईमध्ये सुमारे 179 खरेदी दस्त आढळून आले आहे. त्यामुळे गुरुवारी उपनिबंधक मनोज चौधरी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. त्यानुसार या प्रॉपर्टी कर्जाच्या मोबदल्यात नावे केल्या असल्याची माहिती तपासली जात आहे. या माहितीत तथ्य आढळल्यास संबंधित मालमत्ता ही कर्जदाराला परत करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

Back to top button