नाशिक : बुडीत ठेवींसाठी मनपा न्यायालयात जाणार | पुढारी

नाशिक : बुडीत ठेवींसाठी मनपा न्यायालयात जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवसायानात निघालेल्या श्रीराम बँक व बालाजी बँकेत महापालिकेच्या सुमारे 12 कोटींच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. यामुळे या ठेवी परत मिळविण्याच्या द़ृष्टीने महापालिकेने सहकार आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही ठेवी प्राप्त होत नसल्याने आता महापालिकेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरू केली असून, कायदेशीर सल्लादेखील घेण्यात आला.

दोन्ही पतसंस्थांमध्ये महापालिकेने 2001 पासून अनुक्रमे 11.34 कोटी व 59.66 लाखांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र, दोन्ही संस्था बुडीत निघाल्याने मनपाच्या ठेवी 22 वर्षांपासून अडचणीत सापडल्या आहेत. आर्थिकद़ृष्ट्या काही प्रमाणात नाशिक मनपाच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने तसेच ठेवी मोडून विकासकामे करण्यात आल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या सुमारे साडेतीनशे कोटींच्या ठेवी पूर्ववत करण्यासाठी अवसायानात निघालेल्या बँकांमधील ठेवी परत मिळविण्याकरता आयुक्त पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेकडून जमा असलेल्या शिल्लक रकमेचा विनियोग राष्ट्रीयीकृत बँकेत, अनुसूचित बँकेत अथवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त सहकारी बँकेत स्थायी समितीच्या मंजुरीने मुदतठेव म्हणून ठेवता येतात. परंतु, यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी नियम पायदळी तुडवत महापालिकेची 11 कोटी 34 लाख रुपये श्रीराम बँकेत, तर 59 लाख 66 हजार रूपये बँकेत ठेवली होती. यानंतर या बँकाच अवसायानात निघाल्याने मनपाच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.

जिल्हा न्यायालयात दाद मागणार –  ठेवी परत मिळाव्यात याकरता महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने जिल्हा उपनिबंधकांपासून राज्याच्या सहकार आयुक्तांपर्यंत वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु, सहकार विभागाकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने मनपाने कायदेशीर सल्ला घेत जिल्हा न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली.

हेही वाचा:

Back to top button