नाशिक : कांदा बाजारभाव प्रश्नी ‘प्रहार’चा ठिय्या आंदोलनाचा इशारा | पुढारी

नाशिक : कांदा बाजारभाव प्रश्नी ‘प्रहार’चा ठिय्या आंदोलनाचा इशारा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
शेतकर्‍यांनी कांद्याच्या बाजारभावाबद्दल वारंवार आंदोलने केली, निवेदने दिली, तरीदेखील सरकार कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलत नाही. त्याचा फटका प्रत्यक्ष कांदा उत्पादक शेतकर्‍याला बसतो. कांद्याच्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीतून शेतकर्‍यांना कायमचा दिलासा देण्यासाठी कांद्याच्या बाजारभावाबद्दल सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावा अन्यथा जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयाला घेराव घालून, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा चांदवड तालुका ‘प्रहार’ संघटनेने दिला आहे.

चांदवड तालरिप ‘प्रहार’ संघटनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांची भेट घेत त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले. निवेदनानुसार, जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. सध्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. तसेच शासनाने सुरू केलेल्या नाफेडच्या खरेदीद्वारे शेतकर्‍यांची कुचेष्टा होत आहे. शेतकर्‍यांप्रति शासनाची असलेली उदासीनता बदलून कांद्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन कांदा बाजारभावासंदर्भात ठोस पावले उचलली नाही, तर येत्या काही दिवसांत  जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर शेतकर्‍यांच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा चांदवड तालुका ‘प्रहार’ संघटनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.  निवेदनावर ‘प्रहार’ संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश उशीर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, राम बोरसे, रेवन गांगुर्डे, गणेश तिडके, साहेबराव गांगुर्डे, संदीप देवरे, चंद्रभान गांगुर्डे, चंद्रकांत जाधव, संदीप महाराज, पिंटू तिडके आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button