नाशिक जिल्ह्यात 60 किलोमीटरच्या आतील टोलनाके सुरूच | पुढारी

नाशिक जिल्ह्यात 60 किलोमीटरच्या आतील टोलनाके सुरूच

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
टोलमधील झोलवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 60 किलोमीटरच्या अंतरातील टोल बंद करण्याची घोषणा हवेतच विरली आहे. तब्बल दीड ते दोन महिने उलटल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केंद्र शासनाकडून टोल बंद करण्याबाबत आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील साठ किलोमीटरच्या अंतरात सुरू असलेल्या टोलकडून सर्रासपणे सुरू असलेल्या वसुलीवरून हे स्पष्ट दिसत आहे.

60 किलोमीटर अंतराच्या आत टोलवसुली असू नये, असा राष्ट्रीय महामार्गाचा नियम असताना देशामध्ये मोठ्या प्रमाणावर नियमांच्या विरुद्ध 60 किलोमीटर अंतराच्या आत टोल वसुली करून लुबाडणूक केली जात असल्याचे खुद्द मंत्र्यांनी कबूल केले होते. त्यानंतर असे सर्व टोलनाके बंद केले जातील, असे आश्वासन देऊन लवकरच याबाबत आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले की काय, अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. कारण दीड ते दोन महिने इतका कालावधी उलटूनही टोलनाक्याचे चित्र ‘जैसे थे’ पाहावयास मिळत असून, खुद्द मंत्री महोदय आदेश देण्यास विसरले की काय, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे. यावर कुठलेही पाऊल राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने उचलण्यात आलेले नाही. केंद्र शासनाकडून अद्याप कुठलाही आदेश प्राप्त न झाल्यामुळे टोलनाके बंद होणे मुश्कील असल्याचे संबंधित अधिकारीवर्गाने सांगितले. त्यामुळे टोलचा झोल पाहावयास मिळत आहे.

या टोलनाक्यांचा समावेश… नाशिक जिल्ह्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाका, मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका, पिंपळगाव बसवंत टोलनाका आणि चांदवड येथील टोलनाका असे सरळ टोलनाके असून, चांदवड ते पिंपळगाव हा 60
किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील टोलनाका आहे. पिंपळगाव ते घोटीमधील अंतर 60 किलोमीटरपेक्षा कमी आहे, त्यामुळे यासह शिंदे टोल नाका बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हेही वाचा:

Back to top button